नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या २७ मार्च रोजी मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात आले आहे. या ‘ऐरोमॉडेलिंग शो’च्या आयोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम निर्मितीला चालना मिळणार असून हा शो नागपूरकरांसाठी संस्मरणीय ठरणार, असा विश्वास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार रविवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला.
क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या संकल्पनेतून क्रीडा व युवक सेवा विभाग व राष्ट्रीय छात्र सेनाच्या संयुक्त विद्यमाने या ‘ऐरोमॉडेलिंग शो’चे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या २५ ते ३० विमानांचे आकाशातून पथ संचलन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. ‘ऐरोमॉडेलिंग शो’मध्ये विविध साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हॉर्स रायडिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, एनसीसीचे विविध अत्याधुनिक यंत्र, शस्त्रास्त्रांची माहितीवर्धक प्रदर्शनी तसेच ॲथलेटिक्स स्टेडीयम पॅव्हेलियन इमारतीचे लोकार्पण आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. तसेच एरोमॉडेल्स, वायुसेना, नौदलाची अत्याधुनिक यंत्रे, शस्त्रात्रे, सेवा तसेच एनसीसी आदी संदर्भात यामध्ये माहिती दिली जाणार आहे.
एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीत बोनस गुण
क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी, महाराष्ट्र शासनाने नव्या अधिनियमनानुसार आता एनसीसी विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. राज्य शासनाने नुकत्याच जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियमनाची माहिती त्यांनी यावेळी दिली. एनसीसीचे 'क' प्रणाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना प्राप्त आहे त्यांना पोलीस भरतीच्या परीक्षेच्या एकूण गुणांच्या ५ अधिक बोनस गुण दिले जातील. 'ब' प्रमाणपत्र प्राप्त असणाऱ्यांना ३, तर एनसीसी 'अ' प्रमाणपत्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या एकूण गुणांच्या २ अधिकचे बोनस गुण दिले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.