नागपूर : वर्धेचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी कोझी प्रॉपर्टीजच्या जमिनीची मोजणी करण्याचे आदेश दिल्यानंतर सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांनी जमिनीच्या ईटीएस मशीनद्वारे मोजणीसाठी २९ आॅगस्ट २०१९ रोजी हजर राहावे, अशी नोटीस अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प अधिकारी यांना दिली होती, परंतु प्रत्यक्ष मोजणीसाठी अॅफकॉन्सचे प्रकल्प अधिकारी गैरहजर होते. यावरून अॅफकॉन्स जिल्हाधिकाऱ्यांनाही जुमानत नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अॅफकॉन्सची मुजोरी इथेच थांबली नाही तर मोजणीच्या ठिकाणी अॅफकॉन्सचे १२ कामगार ईटीएस/मशीनद्वारे स्वत:च मोजणी करताना आढळले. केळझर येथील सर्व्हे नं. ६१२/१, ६१२/२, ६१३/१ व ६१३/२ व खापरी येथील सर्व्हे नं. ३३ व ३४ जमिनीची मोजणी आज होती, त्यापैकी केळझर येथील जमिनीवर ही घटना घडली. कोझी प्रॉपर्टीजचे अधिकृत स्वाक्षरीकर्ता नीलेश सिंग यांनी याबाबत सेलू पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. अॅफकॉन्सच्या या ११ कर्मचाºयांची नावे व (वय) नीरज कुमार (२८), दीपक कुमार (१९), संदीप जुनघरे (३३), कौशल कुमार (२६), मुकेश कुमार (२७), साहील पवार (२१), सत्येंद्र कुमार (२४), पुष्पेंद्र यादव (२२), पवन सिंग (३४) आशुतोष कुमार, मनोज धारा (३३) हे असून मुकेश कुमार हेअभियंता असल्याचे कळते. हे सर्व एमएच-३२, वाय २३३४ नंच्या बोलेरो जीपने आले होते. सेलू पोलिसांनी अॅफकॉन्सच्या या १२ कर्मचाºयांना सेलू पोलीस स्टेशन येथे नेले. उपनिरीक्षक पी.एम. गांवडे, कंगाले, जाधव यांनी ही कारवाई केली.
अॅफकॉन्सच्या या १२ कर्मचाºयांचे कृत्य भादंविच्या कलम ४४७ व २०१ चे उल्लंघन करणारे असल्याने सेलू पोलिसांनी त्यांच्याकडून तीन अत्याधुनिक ईटीएस डिजिटल भूमापक यंत्रे, बोलेरो जीप असे ४४ लाखांचे सामान जप्त केले आहे. पुढील तपास सेलूचे ठाणेदार प्रल्हाद काटकर करीत आहे.याबाबत संपर्क केला असता जिल्हाधिकारी भीमनवार म्हणाले ‘‘अॅफकॉन्स कंपनीला किंवा तिच्या कर्मचाºयांना मोजणी करण्याचा अधिकारच नाही, कारण जमिनीची मोजणी जिल्हाधिकारी कार्यालय पॅनेलवर असलेल्या अधिकृत भूमापक एजंसीकडून करून घेते. त्यामुळे अॅफकॉन्सची मोजणी अवैध आहे व त्यांना मोजणी न करण्याचे आदेश तहसीलदार सोनोने यांच्यामार्फत दिले आहेत.’’ असे भीमनवार म्हणाले.
अॅफकॉन्सचे प्रकल्प अधिकारी बी. के. झा यांच्या गैरहजेरीबद्दल भीमनवार म्हणाले, ‘‘त्यांना मोजणीचे वेळी उपस्थित राहण्याची सूचना अॅफकॉन्स कंपनीच्या हितासाठीच केली होती. ते गैरहजर राहिले हा त्यांचा निर्णय आहे. जिल्हाधिकारी कार्यालय त्यांना उपस्थित राहण्यासाठी बाध्य करू शकत नाही,’’ असेही भीमनवार म्हणाले.
अॅफकॉन्सने कोझी प्रॉपर्टीजच्या १०३ एकर जागेतील १०० कोटीचा मुरुम चोरून नेला किंवा डॉ. राजेश जयस्वाल यांच्या शेताजवळील बोर नदीचे पात्र वाढवले किंवा गंगाराम मसराम यांचे शेत खोदले यावर कारवाई करणार का या प्रश्नावर भीमनवार म्हणाले, ‘‘हे सर्व अॅफकॉन्स व खासगी जमीन मालक यामधील विवाद आहेत त्यात जिल्हाधिकारी कार्यालय काही करू शकत नाही. समृद्धी महामार्गाची विकासक एजंसी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आहे व तेच यावर तोडगा काढू शकतात,’’ असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
दरम्यान अॅफकॉन्स व तिच्या उपकंपन्यांच्या दंडेलीचे रोज नवे किस्से बाहेर येत आहेत. अॅफकॉन्सने कोटंबा गावातील सर्व्हे नं. २१६/३ मधील सहा एकर जमिनीपैकी १.५० एकर जमीन खोदून मुरुम काढला असल्याचे कळले आहे. ही जमीन पार्वता शंकर चिडाम, सुनील शंकर चिडाम व सुभाष शंकर चिडाम या मायलेकांची आहे. याचप्रमाणे मौजा इटाळा येथील सर्व्हे नं. २३० मध्येही उत्खनन करून मुरुम काढल्याचे समोर आले आहे. ही जमीन सरकारची आहे, हे विशेष.अद्याप अटक नाही...कोझी प्रॉपर्टीजच्या १०३ एकर जमिनीतून अॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर व एम.पी. कन्स्ट्रक्शनने १०० कोटींचा मुरूम चोरल्याबद्दल एफआयआर नोंदला आहे, पण अद्याप कुणालाही अटक नाही. सेलू पोलिसांवर अॅफकॉन्सचे अधिकारी दबाबतंत्राचा वापर तर करीत नाहीत ना, अशी चर्चा आता पोलीस अधिकारी व कर्मचाºयांमध्ये सुरू झाली आहे.