लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आईवडील, मुलगा, मुलगी असे चौघांचे सुखी कुटुंब. या कुटुंबावर अचानक नियतीचा आघात होतो. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू होतो. दुसरीकडे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलीचा नीटचा पेपर दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतो. आपल्या भावाच्या दु:खाने बहीण कोलमडेल, ती परीक्षाच देऊ शकणार नाही, या विचारांनी आईवडिलांच्या मनात काहूर माजते. अशावेळी ते एक कठोर निर्णय घेतात. काळजावर दगड ठेवत मुलाचे शव मर्च्युरीमध्येच ठेवून ते हसऱ्या चेहऱ्याने घरी परततात आणि भावाला काहीच झाले नाही अशा अविर्भावात मुलीसमोर वागतात. काळीज हेलावणारा हा प्रसंग आहे ‘तुझ्याच साठी’ या मर्मस्पर्शी नाटकातील.मुलांच्या सुखासाठी, त्यांच्या यशासाठी आईवडील किती टोकाचा त्याग करू शकतात याचा प्रत्यय आणून देणाऱ्या या नाटकाचे सादरीकरण शनिवारी वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले. लोकमत सखी मंच आणि साईश्रवण यांच्यातर्फे या नाटकाचा शुभारंभ प्रयोग नागपुरात सादर झाला. देवेंद्र वेलणकर यांनी लिहिलेल्या आणि त्यांच्यासह सोमेश्वर बालपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाने रसिकश्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श केला. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमधून लोकप्रिय झालेले देवेंद्र दोडके यांनी आपल्या भूमिकेत जीव ओतला तर रुपाली कोंडेवार-मोरे यांनी आजच्या काळातील आईची प्रतिमा ताकदीने उभी केली. विशेषत: मुलीच्या परीक्षेपर्यंत मुलाचा मृत्यू लपविलेल्या त्या दोन दिवसांच्या हृदयाला भिडणाऱ्या भावना जिवंत करून रसिकांच्या पापण्या ओलावल्या नसतील तरच नवलं. मुलाच्या भूमिकेत चिन्मय देशकरने प्रामाणिक साथ दिली. मुलगी रागिणीच्या भूमिकेतील बकुळ धवने हिने छाप सोडली. मनमोकळे असूनही आईवडिलांचा आदर व भावावर जीवापाड प्रेम करणारी बहीण तिने उभी केली. सुख, दु:ख, आनंद आणि परीक्षा देऊन हसतमुखाने घरी आल्यानंतर दारात भावाचे निर्जीव शव पाहून दु:खातिरेक तिने हावभावामधून जिवंत केला. भावनांचे विविधांगी कंगोरे उलगडणारी ही भूमिका अविस्मरणीय असल्याचे मनोगत तिने व्यक्त केले. या चौघांमध्ये गजानन महाराजांची भूमिका साकारणारे मुकुंद वसुले यांची छोटीशी भूमिका प्रेक्षकांना सुखावून गेली.नाटकाची प्रकाश योजना अजय करंडे, नेपथ्य स्वप्निल बोहोटे व पार्श्वसंगीत देवेंद्र बेलणकर यांचे होते.
आईवडिलांचा टोकाचा त्याग उलगडणारे मर्मस्पर्शी भावनाट्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 11:11 PM
आईवडील, मुलगा, मुलगी असे चौघांचे सुखी कुटुंब. या कुटुंबावर अचानक नियतीचा आघात होतो. क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू होतो. दुसरीकडे डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलीचा नीटचा पेपर दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असतो. आपल्या भावाच्या दु:खाने बहीण कोलमडेल, ती परीक्षाच देऊ शकणार नाही, या विचारांनी आईवडिलांच्या मनात काहूर माजते. अशावेळी ते एक कठोर निर्णय घेतात.
ठळक मुद्दे‘तुझ्याच साठी’ नाटकाचे सादरीकरण : साईश्रवण व लोकमत सखी मंचचे आयोजन