लाेकमत न्यूज नेटवर्क
माैदा : तालुक्यात काेराेना संक्रमण वाढत असताना रुग्णांच्या साेयीसाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या सेंटरमध्ये १९ खाटांची व्यवस्था करण्यात आली. सध्या या रुग्णालयात काेविडच्या १९ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यांची सुविधा व स्वच्छतेच्या अभावामुळे परवड हाेत आहे.
या ग्रामीण रुग्णालयात प्रवेश करताच सर्वत्र कचरा विखुरला असल्याचे दिसून येते. रुग्णालयातील दाेन्ही वाॅर्डमध्ये काेराेना रुग्णांना ठेवण्यात आल्याने येथे इतर आजाराच्या रुग्णांना भरती करण्यासाठी जागा राहिली नाही. यात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची सर्वाधिक गैरसाेय हाेत आहे. याच रुग्णालयात काेराेना चाचणी व लसीकरण केंद्रही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची गर्दी हाेत आहे. येथे १० रुपये भरून पावती घेतल्यानंतर नागरिकांना काेराेना चाचणीसाठी मुख्य इमारतीच्या मागे असलेल्या दुसऱ्या इमारतीमध्ये पाठविले जाते.
या रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकारी, सफाई कर्मचारी व एक सुरक्षारक्षक कोरोना संक्रमित असल्याची माहिती काही कर्मचाऱ्यांनी दिली. येथील पाच नर्सपैकी एक नर्स प्रसूती रजेवर तर दुसरी तिचे पती कोरोनाबाधित असल्याने रजेवर आहे. त्यामुळे तीन नर्सला संपूर्ण रुग्णालयातील रुग्णांची देखभाल व इतर कार्यालयीन कामे करावी लागतात. आपण मागील काही दिवसांपासून दाेन शिफ्टवर काम करीत असल्याची माहिती येथील परिचारिकांनी दिली.
...
सुविधा व स्वच्छतेचा अभाव
या रुग्णालयात पडून असलेला कचरा लक्षात घेता रुग्णालयाची नियमित साफसफाई केली जात नसल्याचे स्पष्ट हाेते. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने रुग्णांना ते बाहेरून मागवावे लागते. पाण्याअभावी स्वच्छतागृह घाणीने बरबटले आहे. डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी वापरलेले ग्लाेज, औषधांचे वेष्टन, कापसाचे बाेळे, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, खराब झालेल्या पीपीई किट यासह अन्य वस्तू कुचराकुंड्यासह त्याच्या परिसरात विखुरलेल्या आढळून येतात.