नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पूर्वी शहरापुरताच मर्यादित असलेला हा आजार ग्रामीण भागातही पसरायला लागला आहे. शुक्रवारी ११३ दिवसानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्या ६१ वर गेली आहे. यात शहरातील ३४, ग्रामीणमधील २६ तर जिल्हाबाहेरील १ रुग्ण आहे. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ७८ हजार २८६ झाली असून, मृतांची संख्या १० हजार ३३८ वर स्थिर आहे.
नागपूर जिल्ह्यात तिसरी लाट जानेवारी महिन्यात आल्यानंतर फेब्रुवारी महिन्यातच ओसरायला लागली. २३ फेब्रुवारी रोजी ६८ रुग्णांची नोंद झाल्यानंतर मार्च महिन्यात ३७ च्या आत, एप्रिल महिन्यात व मे महिन्यात ६ च्या आत रुग्णसंख्या होती. मात्र जून महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येचा ग्राफ वाढताना दिसून येत आहे. मागील २४ तासात २,६४१ चाचण्यांच्या तुलनेत २.३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
- १७ दिवसात ४४२ रुग्ण
फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच ११ जून रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५५ वर गेली असताना, सहा दिवसात यात पुन्हा वाढ होऊन आज ६१ वर पोहचली आहे. मागील १७ दिवसात ४४२ नव्या रुग्णांची भर पडली. सरासरी रोज २६ रुग्ण आढळून येत आहेत.
-या महिन्यात १६९ रुग्ण बरे
१ ते १७ जून यादरम्यान १६९ रुग्ण बरे झाले आहेत. यात शुक्रवारी सर्वाधिक ४३ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ५ लाख ६७ हजार ६५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सध्या शहरात १८९, ग्रामीणमध्ये १०६ तर जिल्हाबाहेरील १ असे एकूण २९६ कोरोनाचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यातील ३ रुग्ण मेडिकलमध्ये भरती असून, २९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.