‘आरसी’ला पुन्हा मुदतवाढ : डीएमईआरचे दुर्लक्षचसुमेध वाघमारे नागपूरशासकीय रुग्णालयांना रेट कॉन्ट्रॅक्टवरील (दरकरार) उपलब्ध औषध खरेदीचा नियम आहे. जानेवारी २०१३ रोजी हे दर करार संपले. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) त्याचवेळी नवे करार करायला हवे होते. परंतु १८ महिन्यानंतरही मुदतवाढ देऊन वेळ मारून नेली जात आहे. परिणामी औषध कंपन्या जुन्या किमतीवर औषधे देण्यास नकार देत आहेत. यातच मेडिकलच्या औषधांची दोन कोटींची बिले थकल्याने तुटवडा पडला आहे. डीएमईआरच्या उदासीनतेचा फटका सामान्य रुग्णांना बसत आहे. राज्यातील मेडिकल कॉलेज व रु ग्णालयांसाठी दरवर्षी साधारणपणे १०० कोटींच्या घरात औषध व रुग्णसाहित्याची खरेदी केली जाते. हे खरेदी डीएमईआरच्या दरकरार पद्धतीने होते. परंतु ३१ जानेवारी २०१३ ला दरकरार संपले. त्यानंतर चार वेळा दोन-दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ ३१ आॅक्टोबर २०१३ रोजी संपली. यामुळे औषधांची खरेदी प्रक्रिया बंद पडली. सामान्य सलाईन, मेनिटॉक सलाईनसह इतरही जीवनावश्यक औषधांचा तुटवडा पडला. बाह्यरुग्ण व आकस्मिक विभागात औषधांच्या नावाने ठणठणाट होता. अपघातग्रस्त व अनोळखी व्यक्ती आल्यास त्याचे नातेवाईक येईपर्यंत त्याच्यावर औषधोपचार होत नव्हते. अखेर डीएमईआरला जाग येऊन सहा महिन्यानंतर १ मार्च २०१४ रोजी जुन्याच दरकराराला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. मे महिन्यात दरकराराची संपलेली मुदत या महिन्यात परत सप्टेंबर-२०१४ पर्यंत वाढविण्यात आली. डीएमईआरच्या उदासीनतेमुळे दीड वर्षांपासून मुदतवाढच सुरू आहे. करारानुसार दर कराराच्या यादीतील अनेक कंपन्यांचा औषध पुरवठ्याचा कोटा संपला आहे. जुन्या किमतीवर औषध देण्यास यातील काही कंपन्या तयार नाहीत. परिणामी रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांसाठी मोजकीच औषधे आहेत. विशेषत: मेडिकलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या दोन हजाराच्यावर रुग्णांवर आणि भरती असलेल्या दीड हजाराच्यावर रुग्ण औषधाच्या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहेत. बीपीएलच्या रुग्णांचेही हाल सुरू आहेत. दोन कोटींची बिले थकीत४औषधांचे नवीन दरकरार तयार करण्यासाठी डीएमईआर विशेष लक्ष देत नसल्याने अनेक कंपन्यांनी औषध देणे बंद केले आहे. ज्या कंपन्या औषध देत आहेत, त्याची बिले प्रलंबित आहेत. सुमारे दोन कोटींचे बिले थकल्याने येत्या काळात औषधांचा ठणठणाट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१८ महिन्यानंतरही औषधांना ‘मुदत’च
By admin | Published: July 26, 2014 3:00 AM