नागपूर : कोरोनाची परिस्थिती आता नियंत्रणात येऊ लागली आहे. नागपूर जिल्ह्यातील रुग्णांचा पॉझिटिव्हिटीचा दर १३ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. विशेष म्हणजे, २४ एप्रिल रोजी हाच दर ३१ टक्क्यांहून अधिक होता. शनिवारी १५१० नव्या रुग्णांची तर, ४८ मृत्यूची नोंद झाली. ४२ दिवसांनंतर मृत्यूची संख्या ५०च्या खाली आली आहे. रुग्णांची एकूण संख्या ४,६२,११० तर मृतांची संख्या ८,५२० झाली आहे.
‘कडक निर्बंध’चे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. एप्रिल महिन्यात ८ हजारांजवळ गेलेली रुग्णसंख्या आता दीड हजारांच्या घरात आली आहे. मागील १५ दिवसांत साधारण ५०० ते ३०० दरम्यान रोज रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे. मृत्यूदरातही घट आली असून, सध्या १.८४ टक्के आहे. परंतु, चाचण्या कमी होत असल्याने रुग्णसंख्येवर याचा परिणाम तर होत नाही ना, अशी शंकाही बोलून दाखविली जात आहे. शनिवारी ११,६११ चाचण्या झाल्या. २२ मार्चनंतर पहिल्यांदाच कमी चाचण्या झाल्या आहेत. आज रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक, ४,७८० रुग्ण बरे झाले. बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. आतापर्यंत ४,२०,३३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
-शहर व ग्रामीणमध्ये सारखेच रुग्ण
आज शहर आणि ग्रामीणमध्ये जवळपास सारखेच रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. शहरात ७७४ तर ग्रामीणमध्ये ७२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. शहरात २२ तर ग्रामीणमध्ये १४ रुग्णांचे मृत्यू झाले. धक्कादायक म्हणजे, ग्रामीणमध्ये रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर ४७.३२ टक्के आहे. शहरात हाच दर कमी होऊन ७.६७ टक्क्यांवर आला आहे. यावरून ग्रामीणमध्ये आरोग्य विभागाला अधिक काम करणे, विशेषत: चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
:: कोरोनाची शनिवारची स्थिती
दैनिक चाचण्या: ११,६११
एकूण बाधित रुग्ण : ४,६२,११०
सक्रिय रुग्ण : ३३,२५९
बरे झालेले रुग्ण : ४,२०,३३१
एकूण मृत्यू : ८,५२०