लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेब्रुवारीचा पहिला आठवडा उलटून गेल्याने आता हिवाळा संपला असा समज झाला असताना, निसर्गाने परत एकदा ‘यू टर्न’ घेतला आहे. सोमवारी ९.४ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, २४ तासातच पाऱ्यामध्ये ४.७ अंश सेल्सिअस इतकी घसररण झाली. तब्बल ४५ दिवसानंतर पारा ९.४ अंशावर आला. बोचऱ्या थंडीमुळे हुडहुडी भरली असून कपाटात गेलेली स्वेटर्स आणि मफलर्स परत बाहेर निघाली आहेत.
शनिवारपर्यंत रात्री व पहाटे काही प्रमाणात गारवा वाढला होता. मात्र रविवारी सायंकाळनंतर थंडीमध्ये वाढ झाली. सोमवारी पहाटे पारा आणखी घसरला व नागपुरात किमान ९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. २४ तासात अचानक पारा घसरल्याने बोचरी थंडी जास्त जाणवत होती. सरासरीहून हे किमान तापमान ५.३ अंश सेल्सिअस कमी होती. दुसरीकडे कमाल तापमानातदेखील घट झाली व २८.६ अंश इतके तापमान नोंदविल्या गेले. कमाल तापमानदेखील सरासरीहून २.१ अंश सेल्सिअस कमी होते. सोमवारी नोंदविण्यात आलेले यंदाचे हे पाचव्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमान होते.
छत्तीसगड, ओडिशा व दक्षिण मध्य प्रदेशात पुढील काही दिवस शीतलहर असेल. त्यामुळे विदर्भातदेखील काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
यंदाच्या मोसमातील सर्वात कमी तापमान
तारीख - तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
२१ डिसेंबर - ८.४
२० डिसेंबर - ८.६
२२ डिसेंबर - ८.६
२३ डिसेंबर - ९.२
८ फेब्रुवारी - ९.४
२४ डिसेंबर - ९.८
जानेवारीपेक्षा फेब्रुवारी ‘कूल’
सर्वसाधारणत: जानेवारी महिन्यात बोचरी थंडी जाणवते. मात्र यंदा जानेवारीत महिनाभर किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसहून अधिकच होते. ३१ जानेवारी रोजी १०.३ अंश सेल्सिअस तर १५ जानेवारी रोजी १०.४ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात तुलनेने जास्त थंडी जाणवत आहे.
स्वेटर्स, मफलर्स बाहेर निघाली
मागील काही दिवसापासून किमान तापमान १० अंशाहून अधिकच नोंदविल्या जात होते. शिवाय कमाल तापमानातदेखील वाढ होत असल्याने दिवसा काही प्रमाणात गरमीदेखील जाणवत होती. मात्र सोमवारी सकाळी परत एकदा लोकांनी कपाटात टाकलेली स्वेटर्स, मफलर्स बाहेर काढल्याचे दिसून आले.