लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ११ मार्चपासून आईवडिलांची भेट झाली नव्हती. शनिवारी आईचा वाढदिवस असल्याने तिला सरप्राईज भेट देण्याचा मानस कॅप्टन दीपक साठे यांनी बाळगला होता. दुबईतून एअर इंडियाचे विमान घेऊन ते शुक्रवारी भारतात पोहचले पण कोझिकोडे येथील करीपूर विमानतळावर त्यांचे विमान क्रॅश झाले. यात दीपक साठे यांचे निधन झाले. या दुर्दैवी अपघाताने दीपक साठे यांची आईसोबत अखेरची सरप्राईज भेट होऊ शकली नाही.
भारतीय वायुसेनेतून निवृत्त झाल्यानंतर कॅप्टन दीपक साठे एअर इंडियात वैमानिक म्हणून कार्यरत होते. कोरोनामुळे अडकून पडलेल्या भारतीय नागरिकांना दुबईतून परत आणणाऱ्या विमानाचे सारथ्य त्यांच्याकडे होते. मूळचे नागपूरचे असलेले दीपक साठे यांचे वडील वसंत साठे हे भारतीय सेनेत कर्नल होते. टिळकनगर व भरतनगर येथे त्यांचे वास्तव्य अजूनही आहे. वसंत साठे यांचा मोठा मुलगा विकास हासुद्धा भारतीय सेनेत होता. त्यांचेसुद्धा अपघातीच निधन झाले. वडील वसंत साठे हे सेनेत जेथे जेथे वास्तव्यास होते तेथे तेथे दीपक यांचे शिक्षण झाले. दीपक यांनी एनडीए केल्यानंतर भारतीय वायुसेनेत रुजू झाले. त्यांनी सोअर्ड ऑफ ऑनर यासह भारतीय वायुसेनेची सर्व पदके मिळविली होती.नागपुरात दीपक यांचे चुलत भाऊ सुनील साठे वास्तव्यास असतात. दीपक यांच्या मोठ्या मुलाचे लग्न झाल्यानंतर त्यांनी ११ मार्चला नागपुरात एक पार्टी ठेवली होती. तेव्हा आई नीला व वडील वसंत साठे यांची अखेरची भेट झाली. लॉकडाऊनमुळे त्यांनाही जाणे शक्य झाले नाही. शनिवारी त्यांच्या आईचा ८३ वा वाढदिवस होता. तिला सरप्राईज भेट द्यायची दीपक यांची इच्छा होती. पण विमान अपघातात त्यांचा घात झाला.देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला८३ वर्षीय नीला साठे मुलाच्या दुर्दैवी निधनामुळे हळव्या झाल्या होत्या. मुलाबद्दल गौरवोद्गार काढताना त्या म्हणाल्या देव तारी त्याला कोण मारी... पण माझ्या मुलाने १७० लोकांचे प्राण वाचविले. या अपघातात देवाने तारले कुणाला आणि मारले कुणाला. परमेश्वरापुढे डोकं टेकविण्याशिवाय काहीच बोलू शकत नाही. आमचा मुलगा देशासाठी शहीद झाला आहे. मुलगा गेल्याचे दु:ख असलेतरी त्याने अनेकांचे प्राण वाचविले याचा अभिमान आहे.