आॅनलाईन लोकमतनागपूर : एका अपघातात गंभीर जखमी होऊन मेंदू मृत (ब्रेन डेड) झालेल्या २२ वर्षीय तरुण मुलाचे अवयव दान करण्याचा त्या मातेने निर्णय घेतला. परंतु नंतर त्याच्यातील प्रकृतीत काहीशी सुधारणा होत असल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांना आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती केली. परंतु नियतीसमोर सर्वच प्रयत्न थिटे पडले आणि शेवटी तिने मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांना दृष्टी मिळणार आहे. सोमवारी त्या युवकाचे यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’च्या मदतीने पुणे येथे पाठविण्यात आले.वर्धा येथील सामान्य कुटुंबातील तो एकुलता एक मुलगा. कोल्हापूर येथून त्याने केमिकल इंजिनीअरिंग केले. २२ नोव्हेंबर रोजी ‘इंट्रन्स’ परीक्षेसाठी नागपुरात आला असताना ‘एलआयटी’ कॉलेजसमोरून तो आणि त्याचा मित्र दुचाकीवरून जात असताना अचानक ब्रेक लागल्याने हा गाडीवरून खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्याला तातडीने एका खासगी हॉस्पिटलमध्ये आणि तेथून नंतर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांनी तपासून तो ब्रेन डेड असल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांनी कुटुंबीयांना अवयव दानाचा सल्ला दिला. मुलगा गेल्याच्या त्या दु:खातही त्याच्या आईने होकार दिला. परंतु मुलाच्या प्रकृतीत होत असलेली सुधारणा पाहता त्या मातेने आणखी दोन दिवस थांबण्याची विनंती केली. रविवारी हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जन डॉ. अजय कुर्वे, न्यूरोफिजिशिअन डॉ. केतन चतुर्वेदी, डॉ. अंकुर जैन, डॉ. अतुल सोमानी, डॉ. स्वाती लोहिया आदी त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. मात्र नियती जिंकली. रविवारी डॉक्टरांनी ‘ब्रेनडेड’ घोषित केले. त्या स्थितीतही आपल्या मुलाला अवयवरूपी जिवंत ठेवण्याचा निर्णय मातेने घेतला. विभागीय प्रत्यारोपण समितीने पुढील प्रक्रिया पूर्ण केली. सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास त्या युवकाचे यकृत अॅम्ब्युलन्सने ‘ग्रीन कॉरिडॉर’ने विमानतळापर्यंत पोहचविण्यात आले. यात पोलीस उपायुक्त (वाहतूक) रवींद्र परदेसी यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली. हॉस्पिटलचे प्रसिद्ध मूत्रपिंड प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. संजय कोलते व डॉ. सूर्यश्री पांडे हे मूत्रपिंड काढण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊन ‘झेडटीसीसी’च्या सूचनेनुसार एक किडनी वोक्हार्ट हॉस्पिटलच्या एका रुग्णाला तर दुसरी किडनी आॅरेंज सिटी हॉस्पिटलच्या एका रुग्णाला देण्यात आली. युवकाचे दोन्ही नेत्र माधव नेत्रपिढीला देण्यात आले. या दानामुळे तिघांना जीवनदान मिळाले तर दोघांच्या जीवनातील अंधार दूर होणार आहे.