लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाविकास आघाडीच्या जागावाटपात अखेर रामटेकची जागा खेचण्यात उद्धवसेनेला यश आले. उद्धवसेनेच्या पहिल्याच उमेदवार यादीत रामटेकसाठी विशाल बरबटे यांच्या नावाची घोषणा झाली. दक्षिण नागपूरची जागा कायम राखण्यात मात्र काँग्रेस नेत्यांना यश आले. सायंकाळपर्यंत हिंगणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे, तर पूर्व नागपूर काँग्रेसकडे होते. रात्री या दोन मतदारसंघांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ए. बी. फॉर्म दिला. उमरेडची जागा काँग्रेसच्या वाट्याला सुटली आहे.
विशाल बरबटे हे उद्धवसेनेचे रामटेक विधानसभाप्रमुख आहेत. पक्षात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ते मतदारसंघातील चाचेर या मूळ गावचे असून आर्य कार्स या प्रतिष्ठित फर्मचे मालक आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे आता रामटेकमध्ये शिंदेसेनेचे आशिष जयस्वाल विरुद्ध उद्धवसेनेचे विशाल बरबटे यांच्यात सामना होईल, हे स्पष्ट झाले आहे. पूर्व नागपूरची जागा आजवर काँग्रेस लढायची. येथे पहिल्यांदा राष्ट्रवादी लढणार आहे. दुनेश्वर पेठे हे राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आहे. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून ते एकमेव विजयी झाले होते. त्यांनी पक्षाचे गटनेते पदही भूषविले आहे. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांच्याशी त्यांची लढत होईल.
उद्धवसेनेने रामटेक व दक्षिण नागपूर या दोन जागांची मागणी केली होती. रामटेक लोकसभेची जागा आम्ही सोडली; त्यामुळे विधानसभेत या दोन्ही जागा मिळाव्यात, अशी उद्धवसेनेची आक्रमक भूमिका होती. मात्र, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे या दोन्ही जागा सोडण्यास तयार नव्हते. दरम्यान, उद्धवसेनेचा दक्षिणसाठी आग्रह पाहता काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी आमदार अभिजित वंजारी यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत घेत दिल्ली गाठली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, महासचिव मुकुल वासनिक यांची भेट घेत फक्त चार हजारांनी हरलेली दक्षिणची जागा कोणत्याही परिस्थितीत उद्धवसेनेसाठी सोडू नका, अशी आग्रही भूमिका मांडली.
यानंतर जागावाटपाची दुसरी बैठक झाली. तीत सविस्तर चर्चा झाली; मात्र कुणीही मागे हटण्यास तयार नव्हते. त्यामुळे तोडगा निघाला नाही. या बैठकीत तर दोन्ही जागांवरून नाना पटोले व उद्धवसेनेच खासदार संजय राऊत यांच्यात खडाजंगी झाली. आघाडी तुटते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. शेवटी दिल्ली हायकमांडने काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांच्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी सोपविली. थोरात यांनी मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे व शरद पवार यांची वेगवेगळी भेट घेतली व त्यानंतर रात्री झालेल्या तिसऱ्या बैठकीत रामटेकची जागा उद्धवसेनेला व दक्षिण नागपूरची जागा काँग्रेसला सोडण्याचा तोडगा काढण्यात आला.
उमरेडचा प्रस्ताव उद्धवसेनेने नाकारलामंगळवारी रात्री रामटेकची जागा उद्धवसेनेला सोडण्यात आली असतानाही बुधवारी सकाळी पुन्हा ती जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी प्रयत्न केले. काँग्रेसकडे असलेली उमरेडची जागा उद्धवसेनेने लढावी व रामटेकची जागा काँग्रेससाठी सोडावी, असा प्रस्ताव विजय वडेट्टीवार यांच्यामार्फत उद्धवसेनेला देण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत यावर चर्चाही झाली. मात्र, उद्धवसेनेने रामटेक सोडण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागले.
राजेंद्र मुळक, चंद्रपाल चौकसे यांना पुन्हा हुलकावणीरामटेकसाठी काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष राजेंद मुळक व पर्यटकमित्र चंद्रपाल चौकसे इच्छुक होते. दोघांनी मतदारसंघात जोरात तयारी केली आहे. २०१९ मध्येही दोघेही इच्छुक होते. त्यावेळी काँग्रेसने उदयसिंग यादव यांना उमेदवारी दिली. ते पराभूत झाले व आता भाजपमध्ये आहेत. यावेळी ही जागा उद्धवसेनेला गेल्याने पुन्हा एकदा या दोन्ही काँग्रेस नेत्यांना हुलकावणी मिळाली आहे.
रामटेकवर भगवा फडकविणार: विशाल बरबटेरामटेकची जागा उद्धवसेनेच्या वाट्याला आली व आपली उमेदवार म्हणून घोषणा झाली. यासाठी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे आभार मानतो. माझ्या रूपात एका शिवसैनिकाला संधी मिळाली. माझ्यावर पक्षाने टाकलेला विश्वास मी सार्थकी ठरविणार. रामटेकची जागा जिंकून रामटेकच्या गडावर विजयी होऊन पुन्हा एकदा उद्धवसेनेचा भगवा फडकविणार, असा विश्वास उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विशाल बरबटे यांनी व्यक्त केला.
पूर्व नागपुरात परिवर्तन घडेल : दुनेश्वर पेठेशरद पवार यांचा एक सैनिक म्हणून आपण गेल्या अनेक वर्षांपासून नागपुरात राष्ट्रवादीचे काम करीत आहोत. पूर्व नागपूरची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो. पूर्व नागपुरात आजवर केलेल्या कामाची पावती जनता देईल व परिवर्तन घडेल असा विश्वास दुनेश्वर पेठे यांनी व्यक्त केला.
रामटेकच्या गडावर मशाल पेटणार "विशाल बरबटे हे निष्ठावान शिवसैनिक आहेत. पक्षाने एका सच्च्या शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. किमान ५० हजारांनी ही जिंकू व रामटेकच्या गडावर उद्धवसेनेची मशाल पेटवणार." - देवेंद्र गोडबोले, जिल्हाध्यक्ष, उद्धवसेना