नागपूर : घरालगतच्या महिलेवर चाकूने हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीने सोमवारी सकाळच्या सुमारास परिसरातील शेतशिवारात शोध घेत असलेल्या मुलासमोरच विष प्राशन करून आत्महत्या केली. भारत चेतू अंडेलकर (४७, रा. दिघोरा, ता. भिवापूर) असे मृताचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, भारत मागील काही दिवसांपासून घरालगतच्या एका महिलेशी जवळीक करण्याचा प्रयत्न करीत होता. प्रतिसाद मिळत नसल्यामुळे भारतने रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास त्या महिलेवर चाकूने हल्ला करीत गंभीर जखमी केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. दरम्यान, पोलिसांनी व परिसरातील नागरिकांनी रात्रभर त्याचा शोध घेतला. मात्र त्याचा कुठेच पत्ता लागला नाही. अशातच सकाळी ७ वाजताच्या सुमारास भारत हा अड्याळ शिवारातील चुलत भावाच्या शेतातील गोठ्यात लपून बसला असल्याची माहिती त्याच्या मुलाला मिळाली. त्यामुळे मुलगा व त्याच्या मित्रांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मुलाला बघताच भारत तेथून पळत सुटला. मुलगा समजविण्याचा प्रयत्न करीत असतानाच या घटनेमुळे नातेवाईक काय म्हणतील? आता जगून काय फायदा, असे सांगत भारतने खिशातून मिरचीवरील फवारणीचे विषारी औषध काढत प्राशन केले. पोलीस पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत भारतला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.
अपर पोलीस अधीक्षक राहुल माकनीकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे, ठाणेदार महेश भोरटेकर हेही लागलीच घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी भारतच्या मुलाशी संवाद साधला. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. तपास उपनिरीक्षक प्रकाश चंगोले करीत आहे.
महिलेची प्रकृती धोक्याबाहेरहल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला रविवारी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. या महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जखमीच्या पतीने पोलीसांना दिली.
पहिल्या पत्नीवरही केला होता हल्लाआरोपी भारत याने १९९३ मध्ये पहिल्या पत्नीवर सुध्दा अशाच प्रकारे चाकुने हल्ला करीत गंभीर जखमी केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती आरोपीच्या नातेवाईकांनी दिली. याघटनेनंतर भारतला सोडून तिने दुसरे लग्न केले होते. त्यानंतर भारतनेही दुसरे लग्न केले होते.