नागपूर : मकर संक्रमण उत्सवाची नांदी लागताच ‘तिळगूळ खा गोड गोड बोला’च्या सरावास सुरुवात होतो. मात्र, यंदाच्या तिळगुडावर महागाईचा ठोसा पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. संक्रांतीला अवघे २३ दिवस शिल्लक असतानाही बाजारात तिळाची आवक झालेली नाही. त्यामुळे, तिळाचे दर गगनाला भिडले आहेत. सद्य:स्थितीत १८० रुपये किलोच्या आसपास तीळ विकले जात आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत २०.८ हेक्टरने लागवड कमी
विदर्भात नागपूर जिल्ह्यात तीळ पीक घेतले जाते. इतर जिल्ह्यात हे पीक घेण्याचे प्रमाण नगण्य आहे. एका अर्थाने केवळ कौटुंबिक उपयोगासाठी म्हणून हे पीक इतर पिकांसोबत घेतले जाते. नागपूर जिल्ह्यात गेल्या वर्षी ७२ हेक्टरवर तीळ पीक घेतले गेले होते. यंदा मात्र पीक क्षेत्र २०.८ हेक्टरने घटले असून केवळ ५१.२ हेक्टर जमिनीवरच तिळाचे पीक घेतले गेले आहे. त्याचाही परिणाम यंदा तिळाचे दर वाढण्याला कारणीभूत ठरणार आहे.
नागपूर जिल्ह्यात मिश्र पीक म्हणून घेतले जाते तीळ
तिळाच्या उत्पादनात राजस्थान देशात क्रमांक १चे राज्य आहे. महाराष्ट्रातही हे पीक घेतले जाते. खरीप व रब्बी हंगामात हे पीक घेण्याची परंपरा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात तीळ हे मिश्र पीक अर्थात इतर पिकांच्या संगतीला धुऱ्यावर किंवा एखाद्या बांदीमध्ये हे पीक घेतले जाते. नागपूर जिल्ह्यातही तिळाच्या बाबतीत मिश्र पिकाचीच संकल्पना राबविली जाते. सलग पीक कुठेही घेतले जात नाही.
लाल व पांढरे तीळ
लाल, पांढरा व काळा असे तिळाचे पीक असते. नागपूर जिल्ह्यात लाल व पांढरा पीक घेतले जात असून, पांढरा तिळाच्या लागवडीचे प्रमाण अधिक आहे. नागपुरात खरीप हंगामात म्हणजेच जून-जुलैमध्ये हे पीक पेरले जाते आणि डिसेंबरमध्ये कापणी केली जाते. रब्बी अर्थात उन्हाळ्यात हे पीक नागपुरात घेण्याची परंपरा नाही.
मध्यप्रदेश, बुलढाणा येथून आवक
नागपुरात व विदर्भातील इतर जिल्ह्यात बुलढाणा व मध्यप्रदेशातून तिळाची आवक होते. राजस्थानमधूनही तिळाची तूट भरून काढण्याचे प्रयत्न केले जाते. एका अर्थाने नागपूर व विदर्भ पूर्णत: तिळाच्या आयातीवरच निर्भर असल्याचे स्पष्ट होते.
तिळाचे दर बहुदा स्थिरच
तिळाचे दर बहुतांश करून स्थिरच असतात. खरीप लागवडीनंतर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने तिळाचे दर कमी होतात. त्यानंतर दरामध्ये स्थैर्य असते. रबी हंगामाच्या लागवडीनंतर मार्च-एप्रिलमध्ये तिळाची आवक होत असल्याने दरामध्ये फारसा फरक पडत नाही. नागपूरच्या बाजारात सद्य:स्थितीत तिळाचे दर प्रतिकिलोला १८० रुपये आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे दर ४० ते ५० रुपयांनी अधिक आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आवक वाढल्यावर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मागणीही मोठी असल्याने दर कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. तिसऱ्या आठवड्यापासून मात्र त्यात घसरण होण्याची शक्यता आहे.
तिळाचे दर (प्रतिकिलो)
२०२० - १०० ते ११० रुपये
नोव्हेंबर २०२१ - १६५ ते १७० रुपये
डिसेंबर २०२१ - १८० रुपये
.............