लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॉंग्रेस पक्षाने उपोषण केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षातर्फेदेखील उपोषणाचा मार्ग निवडण्यात आला आहे. दिल्लीप्रमाणेच नागपुरातदेखील सामूहिक उपोषण करण्यात येणार आहे. संसदेत विरोधी पक्षांकडून सुरू असलेल्या गोंधळाच्या विरोधात हे उपोषण राहणार आहे. गुरुवारी नागपुरात उपराजधानीतील सर्व आमदार या उपोषणात सहभागी होणार आहेत.पंतप्रधानांनी १२ एप्रिल रोजी उपोषण करण्याची घोषणा केल्यानंतर नागपूर भाजपानेदेखील यासंदर्भात तयारी केली आहे. लोकशाही सुरळीत चालावी यासाठी संसदेचे कामकाज नियमित होणे आवश्यक आहे. विरोधकांचा खरा चेहरा उघड व्हावा, या उद्देशातून आम्ही १२ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ७ या कालावधीत संविधान चौक येथे राज्यसभा खासदार डॉ.विकास महात्मे यांच्या नेतृत्वात उपोषणाला बसणार आहोत, अशी माहिती शहराध्यक्ष आ.सुधाकर कोहळे यांनी दिली. उपोषणाला माजी खासदार अजय संचेती, आ.सुधाकर देशमुख, आ.अनिल सोले, आ.गिरीश व्यास, आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे,आ.डॉ मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार, संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.