उमरेड : ग्रा.पं. निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी सरपंच पदाचे पूर्वीचे आरक्षण रद्द करण्यात आले. यानंतर १५ रोजी ग्रा.पं.च्या निवडणुका जाहीर झाल्या. राज्य सरकारच्या निर्णयानुसार आता निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ग्रा.पं.च्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात येत आहे. त्यानुसार सोमवारी उमरेड तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निश्चित करण्यात आली. तालुक्यात १४ ग्रा.पं.साठी जानेवारीत निवडणुका झाल्या होत्या. आजच्या आरक्षण सोडतीनुसार तालुक्यातील ४७ ग्रामपंचायत पैकी एकूण २४ ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित झाल्या आहे. तहसील कार्यालयात तहसीलदार प्रमोद कदम यांच्या उपस्थितीत ग्रा.पं.चे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार टी. डी. लांजेवार यांची उपस्थिती होती. तालुक्यातील ९ ग्रामपंचायती अनुसूचित जाती करीता आरक्षित झाल्या आहेत. यामध्ये बोरगाव कलांद्री, वेलसाखरा, गोधनी, खुसार्पार (उमरेड) तसेच अनुसूचित जाती महिला प्रवर्गाकरिता सेव, कळमना (उमरेड), धुरखेडा, शिरपूर आणि ठोंबरा या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी ७ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या. यामध्ये बोथली, खैरी चारगाव आणि डव्हा तसेच अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी आंबोली, खुसार्पार (बेला), देवळी आमगाव आणि चांपा या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण १३ ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले. या प्रवर्गात ब्राम्हणी, सावंगी (बुजूर्ग), आपतुर, हेवती, पिपरा, बोरगाव (लांबट), हळदगाव तसेच नागरिकांचा मागास महिला प्रवर्गासाठी सिंगोरी, सिर्सी, किन्हाळा (सिर्सी), परसोडी, विरली, हिवरा या ग्रामपंचायतींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. १८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदासाठीचे आरक्षण सर्वसाधारण खुला आरक्षित झाले. यामध्ये पाचगाव, सायकी, वायगाव (घोटुर्ली), उदासा, गावसुत, बेला, चनोडा, सावंगी (खुर्द), नवेगाव साधू यांच्यासह सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिलांसाठी उटी, मांगली, शेडेश्वर, कळमना (बेला), सालई राणी, मकरधोकडा, मटकाझरी, निरव्हा, सुरगाव या ग्रामपंचायती आरक्षित झाल्यात.
---------------
ग्रामपंचायतीसाठी सोमवारी काढण्यात आलेले आरक्षण हे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत होणाऱ्या सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लागू राहील. १४ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक आटोपल्यानंतर उर्वरित अन्य ३३ ग्रामपंचायतीसाठी दुसऱ्यांदा आरक्षण सोडत काढली जाणार नाही.
- टि. डी. लांजेवार
नायब तहसीलदार (निवडणूक)