निवडणुकीनंतर राफेल घोटाळ्याची चौकशी होणार; राहुल गांधींचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 07:19 PM2019-04-04T19:19:27+5:302019-04-04T19:34:58+5:30
चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर राफेलसारख्या घोटाळ्यांची चौकशी होईल. मोदींनी प्रक्रियाच नष्ट केली. कारवाई तर होणारच. घोटाळा कुणी केला हे पर्रिकर यांना माहीत होते. चीनमध्ये मेड इन विदर्भ दिसेल. विदर्भाला आम्ही सिंगापूर, दुबई सारखे हब बनवू इच्छित होतो. पण यांनी कामच केले नाही, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला.
नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या मतदारसंघात कस्तुचंद पार्कवर राहुल गांधी यांची सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा, अंबानी कनेक्शन आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर सडकून टीका केली.
अनिल अंबानींचं ४५ हजार कोटींचं कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचं कर्ज माफ का करत नाही? असा सवाल करत त्यांनी ज्या कंपनीला विमान बनवण्याचा काहीही अनुभव नाही, ज्याच्याकडे पाच पैसेसुद्धा नाहीत त्यांना मोदी सरकारने राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्यांची चौकशी करण्याचा इशाराही राहुल यांनी दिला.
तसेच गरिबीवर काँग्रेस पक्षाचा सर्जीकल स्ट्राईक आहे. भारतातील गरीब २०% नागरिकांना म्हणजेच ५ कोटी कुटुंबातील २५ कोटी नागरिकांच्या खात्यात वर्षाला ७२००० रुपये जमा करणार. ही योजना आपण देशाच्या अर्थतज्ज्ञांसोबत मिळून बनविल्याचा दावाही त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्वासन देतात, आम्ही काम करतो. 72000 रुपयांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान होणार नाही. मी लोकांसोबत दूरपर्यंतचे संबंध बनवायला आलो आहे. मी 2-3 दिवसांसाठी राजकारण करायला आलेलो नाही. देशात 12 हजार रुपये प्रति महिने मिळकत झालीच पाहिजे. आम्ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राईक करणार. अर्जुनासारखे माझे लक्ष्य ठरले आहे. 20 टक्के गरीब लोकांना 5 वर्षात 3 लाख 60 हजार देणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपला देश बंधुभावाचा आहे. हिंसा करा असे कुठेच लिहिले नाही. गीतेत पण नाही. पण मोदी केवळ द्वेषाची भाषा बोलतात. अडवाणी हे गुरू होते, त्यांची अवस्था पहा . हा हिंदू धर्म आहे का ? मी जे म्हणतो ते मनापासून म्हणतो. आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. देशातून गरिबी नेहमीसाठी हटविल. देश चीनसोबत स्पर्धा करू शकतो. खोटं ऐकलं, आता सत्य ऐका. अडवाणी यांची हालत पहा, गुरुस्थानी आहेत, पण दुर्लक्षित ठेवले आहे, असा आरोपही त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर केला. तसेच महिलांना शक्ती देणार. 33 टक्के आरक्षण देणार विधिमंडळ व संसदेत. महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षण मिळणार, असे आश्वासन दिले.
यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भाषणे झाली. राहुल गांधी हे देशाचे खरे शिपाई. मोदी सरकारच्या काळात सर्व काळा पैसा गुजरातमध्ये गेला. राफेलची फाईल दाबून ठेवली. सौगंध मुझे अंबानी की, मै फाईल नही मिलने दुंगा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी मोदींवर टीका केली.
तर देशात 5 वर्षात शेतकरी, व्यापारी संकटात. बेरोजगारी वाढली. भाजपचे लोकांना सत्तेची धुंदी चढली आहे . देशाचा भ्रमनिरास झाला आहे, असे अशोक चव्हाण म्हणाले.