निवडणुकांनंतर चौकीदार तुरुंगात असेल - राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 05:30 AM2019-04-05T05:30:46+5:302019-04-05T05:46:39+5:30
सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफी
योगेश पांडे / आनंद डेकाटे
नागपूर : राफेल करारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च वाटाघाटी करून बोलणी करण्याची प्रक्रियाच नष्ट केली. आम्ही सत्तेवर येताच राफेल घोटाळ्याची चौकशी करू आणि चौकीदार तुरुंगात असेल, असा इशारा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिला. येथे नाना पटोले (नागपूर) व किशोर गजभिये (रामटेक) या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची गुरुवारी सभा झाली. राज्यातील पहिल्याच सभेत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. व्यासपीठावर काँँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्याचे प्रभारी आशिष दुवा, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पीरिपाचे अध्यक्ष आ.जोगेंद्र कवाडे, कॉंग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष नितीन राऊत आदी उपस्थित होते.
खा. गांधी म्हणाले, राफेल घोटाळा कुणी केला हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना माहिती होते. त्यामुळेच जे काही विचारायचे ते वरिष्ठांना विचारा असे ते म्हणाले होते. मोदी यांनी कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानींना फायदा मिळवून दिला. मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ केले. आम्ही सत्तेवर आलो तर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. संसद, विधिमंडळ व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ.
मोदी यांचे आता वय झाले आहे. त्यांना घाई आहे व त्यामुळेच ते विविध योजनांची नावे घेऊन खोटे बोलतात. मला कसलीही घाई नाही. मी दोन-तीन दिवसांसाठी राजकारण करण्यासाठी आलेलो नाही.
मला जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करायचे आहे. पुढील १५-२० वर्षे मी जनतेसोबत असेल, असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींना चिमटा काढला.
लालकृष्ण अडवाणी यांचा दाखला देत राहुल गांधी यांनी मोदींच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित केला. अडवाणी हे मोदींचे गुरू होते. मात्र आता त्यांची अवस्था वाईट झाली आहे. त्यांच्या वाट्याला केवळ अपमान आला. आपल्या गुरूचा सन्मान करा, असे हिंदू धर्म सांगतो. मात्र अडवाणी यांची हेटाळणी करणाºया मोदींचा हा हिंदू धर्म आहे का, असा सवाल गांधी यांनी केला.
असा आला ७२ हजारांचा आकडा
च्काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील ‘न्याय’ योजनेचा ७२ हजारांचा आकडा
कसा समोर आला हे सांगताना ते म्हणाले की, आम्ही काही नामांकित अर्थतज्ज्ञांना अर्थव्यवस्थेला धक्का न लागता गरिबांना मदत कशी होईल, हे विचारले. त्यांनी अभ्यासानंतर ७२ हजार हा आकडा काढला. या रकमेमुळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार नाही असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चव्हाण-दर्डा यांनी केले राहुल गांधी यांचे स्वागत
च्नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राहुल गांधी यांचे आगमन झाले असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष
खा. अशोक चव्हाण व लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा आदींनी राहुल गांधी यांचे स्वागत केले. यावेळी
गांधी हे दर्डा यांना बाजूला घेऊन गेले आणि त्यांच्याशी काही वेळ एकांतात चर्चा केली.
मेड इन विदर्भ
‘मेक इन इंडिया’ योजना चांगली होती. मात्र यामुळे मूठभर लोकांचाच फायदा झाला. विदर्भातील शेतकऱ्याचा माल थेट लंडन, अमेरिकेत विकला जावा, असे आमचे ‘व्हिजन’ आहे. आता जागोजागी ‘मेड इन चायना’ दिसते. मात्र भविष्यात चीनमध्ये ‘मेड इन विदर्भ’ दिसेल, असे राहुल गांधी म्हणाले.