सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘नॉनट्यूबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरिया’ (एनटीएम) या दुर्मिळ रोगाच्या निदानासाठी एका १२ वर्षीय मुलीला तब्बल चार वर्षे विविध खासगी रुग्णालयाचे उंबरठे झिजवावे लागले. आजाराचे दुखणे सहन करीत विविध उपचार घेतले. विशेष म्हणजे क्षयरोग नसताना दीड वर्षे तिने क्षयरोगाचे औषधे घेतली. अखेर मेडिकलच्या श्वसन रोग विभागात उपचारासाठी आल्यावर नेमक्या रोगाचे निदान झाले आणि ९९ टक्के मुलगी बरीही झाली.प्रांजली (नाव बदलले) सात वर्षांची असताना तिच्या उजव्या कानाच्या जवळ आणि खाली सूज येऊन दुखत होते. याशिवाय तिला इतर कुठलाही त्रास नव्हता. फेब्रुवारी २०१५ रोजी आई-वडिलांनी तिला शहरातील एका प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञाकडे घेऊन गेले. बालरोग तज्ज्ञाने तापसणी करून जनरल सर्जनकडे पाठविले. सर्जनने सूज आलेल्या जागेवर छोटा चिरा देऊन ‘पस’ काढला. यामुळे सूज कमी झाली. परंतु जुलै २०१५ मध्ये पुन्हा त्रास व्हायला लागला. यावेळी तिच्या वडिलांनी बाल शल्यचिकित्साकांकडे नेले. डॉक्टरांनी सात दिवसांचे औषध दिले. यामुळे सूज कमी झाली होती. परंतु नंतर पुन्हा सूज वाढून पस निघणे सुरू झाले होते.आॅगस्ट २०१६ रोजी बालशल्यचिकित्सकांनी प्लास्टिक सर्जनकडे पाठविले. सर्जनने गाठीला चिरा देत, पू (पस) बाहेर काढला. ‘पस’ची तपासणी केली असता त्यात क्षयरोगाचे जंतू आढळून आले. उपचार सुरू करण्यापूर्वी तिला बालरोग तज्ज्ञाचा सल्ला घेण्यासाठी पाठविले. बालरोग तज्ज्ञाने ‘इन्फेक्श्न स्पेशालिस्ट’कडे पाठविले. त्यांनी तपासून जीवाला धोका नसल्याचे व तपासणीच्या अहवालावर औषधे सुरू न करता कान, नाक व घसा (ईएनटी) तज्ज्ञाकडे पाठविले. आॅक्टोबर २०१६मध्ये या तज्ज्ञाने तपासल्यावर कानाचा आणि गाठीचा कुठलाही संबंध नसल्याचे लिहून दिले. परंतु मुलीचा त्रास वाढतच असल्याने प्रांजलीला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. येथे ‘ईएनटी’ तज्ज्ञाने तपासून हॉस्पिटलच्याच बालशल्यचिकित्साकाकडे पाठविले. त्यांनी पुन्हा चिरा देऊन पस काढला. त्याचबरोबर बायोप्सी करीत गाठीचा सूक्ष्म तुकडा तपासणीसाठी पाठविला. परंतु तपासणीत काही निदानच झाले नाही. नंतर प्रांजलीला हॉस्पिटलच्या ‘डॉट सेंटर’मध्ये पाठविले. आॅगस्ट २०१६मध्ये क्षयरोगाच्या पॉझिटिव्ह आलेल्या अहवालावरून प्रांजलीला क्षयरोग औषध सुरू केले. परंतु दोन महिने होऊनही सूज कमी झालेली नव्हती. दुखणे व पस निघणे सुरूच होते. यामुळे हॉस्पिटलच्या बालरोग तज्ज्ञाकडे तिला पाठविले. परंतु तेथेही काहीच झाले नाही.हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी तिला एप्रिल २०१७ मध्ये इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) श्वसनरोग विभागात पाठविले. तोपर्यंत प्रांजलीचा क्षयरोगाचा सहा महिन्याचा पूर्ण कोर्स झाला होता. विभागाने पुन्हा तीन महिन्यांचे औषध दिले. एकूण नऊ महिन्यांचे औषधे घेऊनही तिचा त्रास कमी झाला नव्हता. या विभागाने रुग्णालयाच्याच शल्यचिकित्सा विभागाकडे पाठविले. येथील डॉक्टरांनी तिला आणखी नऊ महिने क्षयरोगाचे औषधे घेण्याचा सल्ला दिला. प्रांजलीने एकूण दीड वर्षे क्षयरोगाचे औषधे घेतले. परंतु आराम पडला नाही. अखेर तिच्या वडिलांनी शेवटचा उपाय म्हणून नोव्हेंबर २०१८ मध्ये मेडिकलच्या श्वसनरोग विभागात घेऊन गेले. या विभागाचे प्रमुख डॉ. सुशांत मेश्राम यांनी तपासले व तातडीने सुरू असलेल्या सर्व औषधी बंद करण्यास सांगितले. त्यांनी प्राथमिक स्तरावर ‘नॉनट्यूबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरिया’ आजार असल्याचे निदान केले आणि त्यानुसार उपचाराला सुरुवात केली. गेल्या तीन महिन्याच्या उपचारानंतर प्रांजली ९९ टक्के बरी झाली आहे. तब्बल चार वर्षांनंतर विविध उपचार व तपासण्या केल्यानंतरही रोगाचे निदान न झालेल्या प्रांजलीच्या रोगाचे निदान मेडिकलमध्ये झाले. तिच्या उपचारात डॉ. सुशांत मेश्राम यांच्यासह डॉ. रवी यादव, डॉ. अमित कालेन व डॉ. संकेत अग्रवाल यांनी सहकार्य केले.
तिच्या ‘हिस्ट्री’मधून आजाराचे निदानप्रांजलीवर उपचार सुरू करण्यापूर्वी तिची ‘हिस्ट्री’ घेतली. यात तिला लहानपणी जमिनीवर पडलेल्या वस्तू किंवा भिंतीवर नखाने खरडून तोंडात टाकण्याची सवय असल्याचे समोर आले. यातूनच ‘नॉनट्यूबरक्युलॉसिस मायकोबॅक्टेरिया’ निदान झाले. कारण हवेत, पाण्यात, जमिनीवर ‘नॉनट्यूबरक्युलॉसिसचे मायकोबॅक्टेरिया’ असतात. याची थोडी फार लक्षणे क्षयरोगाच्या लक्षणासारखी दिसत असली तरी हा आजार पूर्णत: वेगळा आहे.-डॉ. सुशांत मेश्राम, श्वसनरोग विभाग, मेडिकल