नागपूर : गोवा विधानसभा निवडणुकीतील यशानंतर भाजपतर्फे तेथील निवडणूक प्रभारी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुरुवारी विजय रॅली काढण्यात आली. राज्यातील जनता महाविकास आघाडी शासनाला कंटाळली असून गोव्याप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजपची एकहाती सत्ता आणू, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व फडणवीस यांनी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापर्यंत फडणवीस यांची विजय रॅली काढण्यात आली. या रॅलीत यावेळी मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. रॅलीच्या समापनानंतर आयोजित सभेदरम्यान फडणवीस व गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गोव्यात मनोहर पर्रीकर असतानादेखील इतरांशी हातमिळावणी करावी लागायची. यंदा जनतेने पूर्ण विश्वास टाकला.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेदेखील गोव्यात कंबर कसली होती. मात्र, गोवा, उत्तर प्रदेशसह चारही राज्यांत मतदारांनी जात, पंथ, धर्म याला बाजूला सारत विकासावर भर दिला. लोक विकासासाठी मत देतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जातीयवाद व सांप्रदायिकतेचे राजकारण करू नये. कार्यकर्ता जाती, धर्म नव्हे तर कामाने श्रेष्ठ ठरतो, असे गडकरी म्हणाले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. परिणय फुके, माजी आमदार सुधाकर कोहळे, दयाशंकर तिवारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाविकास आघाडी सरकार विरोधातील लढाई शिगेला
अशा स्वागताची मी कल्पनादेखील केली नव्हती. खरा विजय कार्यकर्त्यांचाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशात विश्वासाचे वातावरण तयार झाले आहे. काँग्रेस-विरोधी पक्षांचे जिंकण्याचे स्वप्न ‘मुंगेरीलालचे हसीन सपने’च ठरले. राष्ट्रवादी-शिवसेनेची गोव्यात ‘नोटा’शी लढाई होती व ते ‘नोटा’शीदेखील हरले. महाराष्ट्रातदेखील परिवर्तनाची लाट आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्टाचाराला सामान्य जनता कंटाळली आहे. राज्यात महावसुली आघाडीचे सरकार आहे. आता लढाई शिगेला पोहोचली आहे. सरकारने आमच्याविरोधात कितीही केसेस केल्या तरी मंत्र्यांचा भ्रष्टाचारी चेहरा जनतेसमोर आणूच. येणाऱ्या मनपा, स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभेच्या निवडणुका एकहाती जिंकू, असा दावा फडणवीस यांनी केला.
उत्तर प्रदेशचा ‘ट्रेन्ड’ नागपुरात, जेसीबीने पुष्पवर्षाव
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक विजयानंतर बुलडोझरवरून रॅली काढत जेसीबीने पुष्पवर्षाव करण्यावर भर होता. भाजपच्या कार्यतर्त्यांनी फडणवीस यांचे गडकरींच्या निवासस्थानासमोर जेसीबीने पुष्पवर्षाव करून स्वागत केले.
गडकरींचे पाया पडून घेतले आशीर्वाद
यावेळी फडणवीस यांनी गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतले. कांचन गडकरी यांनी यावेळी फडणवीस यांचे औक्षण केले.