नरेश डोंगरे नागपूर : इंडिगोचे एटीआर विमान गुरुवारी रात्री ७ : ३० वाजता नाशिक एअरपोर्टवरून अवकाशात झेपावले. रात्री ९:१० वाजता ते नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमातळावर उतरणार अशी प्रवाशांची अपेक्षा होती. मात्र, कसले काय, प्रतिकुल हवामानामुळे नागपूर जवळ असताना विमान आकाशात हेलकावे खाऊ लागले. त्यामुळे विमानात असा काही थरार निर्माण झाला की अनेकांसाठी हा प्रवास अत्यंत भयावह ठरला.
इंडिगोचे हे ७२ सिटर विमान नाशिकहून नियोजित वेळेला रात्री ७: ३० वाजता नागपूरकडे येण्यासाठी आकाशात झेपावले. अर्ध्या तासानंतर हवामान कमालीचे खराब झाले. जोरदार वादळी पाऊस अन् विजांचा कडकडाट विमानालाच नव्हे तर प्रवाशांनाही हलवून सोडणारा ठरला. विमान मागे-पुढे, डावीकडे उजवीकडे हेलकावे खाऊ लागले. परिणामी प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. अनेकांना डोकेदुखी, कानदुखी, मळमळ सुरू झाली. रात्रीचे ९: २० वाजले तरी विमानतळावर विमान उतरण्याचे नाव घेत नव्हते. त्यामुळे मुले अन् वृद्धच नव्हे तर तरुण मंडळीही घाबरली. अनेकांनी तर रडारडही सुरू केली. जीव मुठीत घेऊन अनेक प्रवासी देवाची करुणा भाकू लागले. अशात पायलटने घोषणा केली. 'हवामान खूप खराब आहे. वादळ आणि पावसामुळे आम्ही जमिनीवर उतरू शकणार नाही. विमानात पुरेसे इंधन आहे. त्यामुळे वातावरण अनुकूल होईपर्यंत प्रवाशांनी प्रतिक्षा करावी.' पायलटची ही घोषणा वजा विनंती प्रवाशांच्या घबराटीत आणखीच भर पाडणारी होती. हृदयाची धडधड वाढली असतानाच साशंक झालेले प्रवासी काय होते अन् काय नाही या प्रतिक्षेत एकमेकांकडे बघत होते. रात्रीचे १०:१० वाजले अन् अखेर धावपट्टीवर विमान उतरले. त्यानंतर प्रतिकुल स्थितीत संयम राखत सुरक्षित लॅण्डींग केल्याबद्दल प्रवाशांनी टाळ्या वाजवून पायलटचे अभिनंदन केले.
... तर विमान इंदूरला नेले जाणार होतेस्थिती एवढी खराब होती की नागपूरच्या अवकाशात नरखेड आणि काटोलवर या विमानाने तब्बल ९ फेऱ्या मारल्या. आणखी काही वेळ हवामान असेच राहिले असते तर हे विमान नागपूर विमानतळावर उतरवण्याचा निर्णय रद्द करून ते इंदूरला नेण्याचा विचार विमानतळ प्राधिकरणाने केला होता.आयुष्यभर न विसरण्यासारखा अनुभवया विमानात नागपूर रिजनच्या पोस्टमास्टर जनरल शोभा मधाळेसुद्धा होत्या. मिटिंग आटोपून त्या नागपूरला येण्यासाठी निघाल्या होत्या. हा थरारक अनुभव आपण आयुष्यभर विसरू शकत नसल्याचे, त्यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे, मधाळे यांनी विमानतळावर उतरल्यानंतर स्टेशन व्यवस्थापकांची भेट घेऊन पायलटचे काैतुक केले.