नागपूर : महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी धंतोली, रामदासपेठ व लक्ष्मीनगर परिसरातील अनेक अतिक्रमणावर हातोडा चालविला. यात धंतोली परिसरातील अनेक रुग्णालयांनी पार्किंगसाठी केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच १० हजार रुपयांच्या डिमॉलेशन शुल्काचाही भरणा केला. यानंतर मनपाच्या पथकाने अवंती हॉस्पिटलच्या पार्किंगसह कॅन्टिनचे शेड तोडले. दरम्यान अवंती हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सुद्धा १० हजार रुपयांचे डिमॉलेशन शुल्क जमा केले. यानंतर बरडे बिल्डिंगमधील डीटीडीसी कुरिअर कार्यालयाचे पार्किंग हटवून अतिक्रमण केलेली मोठी जागा मोकळी करण्यात आली. तसेच संबंधित कुरिअर कंपनीवर दोन हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. पुढे सिद्धिविनायक अपार्टमेंटमधील टीनाचे शेड काढण्यात आले. तसेच अवंती हॉस्पिटल शेजारच्या अॅड़ देशपांडे यांनी पार्किंगसाठी केलेले शेड हटवून त्यांच्याकडूनही दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. येथून मनपा पथकाने रामदासपेठकडे आपला मोर्चा वळविला. येथील वानखेडे आणि मनोज बिल्डिंगचे पार्किंग शेड तोडण्यात आले. तसेच दीक्षाभूमी पुढील फुटपाथवरील पुस्तकांची दुकाने आणि मूर्ती विक्रेत्यांना हटविण्यात आले. यानंतर लक्ष्मीनगर चौक ते आठ रस्ता चौकापर्यंत फुटपाथवरील दुकाने, चहा टपऱ्या, फुलांची दुकाने व भाजीपालावाल्यांचे अतिक्रमण उठवून, दोन हातठेले जप्त करण्यात आले. ही कारवाई धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, अशोक पाटील, यादव, जांभुळकर, झोन अभियंता नरेंद्र भंडारकर, एस. बी. बागडे, मंजू शाह, संजय शिंगणे, जमशेद अली व शरद इरपाते यांनी केली.(प्रतिनिधी) वाहतूक विभागाची विशेष मदत या कारवाईत मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकासोबत वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. दरम्यान अनेक ठिकाणी अतिक्रमणकर्त्यांनी वाहतूक पोलिसांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.
हायकोर्टाच्या दणक्यानंतर आली जाग
By admin | Published: January 21, 2017 2:19 AM