लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्स येथील आयकर भवनात पदस्थ मुख्य आयकर आयुक्त कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आयकर विभागात खळबळ उडाली आहे.मंगळवारी आयकर भवन परिसर सील केल्यानंतर २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आता कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर सदर येथील सराफ चेंबरचे आयकर कार्यालयसुद्धा १९ जुलैपर्यंत बंद करण्यात आले आहे. या कार्यालयाला सॅनिटाईज्ड करून येथे कार्यरत काही अधिकाऱ्यांची कोविड तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासणीत कोणतेही अधिकारी पॉझिटिव्ह आलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली.आयकर विभागाचे नागपुरात तीन प्रमुख कार्यालय आहेत, हे विशेष. यामध्ये सिव्हिल लाईन्स येथील आयकर भवन, सेमिनरी हिल्स येथील एमईसीएल भवन आणि सदर येथील सराफ चेंबर्सचा समावेश आहे. आयकर भवनात पदस्थ मुख्य आयकर आयुक्तांवर शारीरिक व्याधीमुळे मुंबईत उपचार सुरू आहेत. याकरिता त्या गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईला गेल्या होत्या. तेथून परतल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. याशिवाय त्या विभागातील अन्य लोकांच्या संपर्कात आल्या होत्या. त्यानंतर सर्जरीकरिता मुंबईला परत गेल्या होत्या. उपचाराआधी घेण्यात आलेल्या कोविड टेस्टचा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर, आयकर भवन परिसर सील करून २६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते.आयकर विभागातील कर्मचाऱ्यांच्या मागणीनंतर आता सदर येथील सराफ चेंबर्सचे आयकर कार्यालयसुद्धा चार दिवसासाठी १९ जुलैपर्यंत सील करण्यात आले आहे. मुख्य आयकर आयुक्तांच्या संपर्कात आलेल्या काही अधिकाऱ्यांचा कोविड अहवाल आज आला. त्यात ते निगेटिव्ह आले आहेत.
आयकर भवनानंतर आता चेंबर्सचे कार्यालयसुद्धा सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 10:23 PM
सिव्हिल लाईन्स येथील आयकर भवनात पदस्थ मुख्य आयकर आयुक्त कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर आयकर विभागात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्देकार्यालय सॅनिटाईज्ड : अधिकाऱ्यांची चाचणी