नागपूर : लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पहाटे दरवाजा उघडा ठेवून झोपणे एका कुटुंबाला फारच महागात पडले. चोरट्यांनी देवघरातील मूर्तींसह दागिने व रोख अशा १० लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली व त्यामुळे खळबळ उडाली आहे. मनिष निर्मल सुगंध (४५, रिद्धी अपार्टमेंट, क्वेटा कॉलनी) हे किराण्याचे व्यापारी असून यांच्या घरी ही घटना घडली. रविवारी त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन झाले व त्यांच्या या घरातील पहिलेच लक्ष्मीपूजन होते.
देवघरात चांदीच्या तीन मूर्त्या, सोन्याचे लहानमोठे ९ बिस्कीट, चांदीची नाणी, रोख ८० हजार ठेवले होते. रात्री पूजना झाल्यावर सर्व झोपले. पहाटे पाच वाजता फ्लॅटचे दार उघडे ठेवण्यात आले. यानंतर अज्ञात चोरट्यांनी आत शिरून देवघरातील ९.९९ लाखांचा ऐवज लंपास केला. जाताना चोरटे मोबाईल फोनदेखील घेऊन गेले. साफसफाई करणारी महिला आल्यानंतर सुगंध झोपेतून उठले. त्यावेळी त्यांना मोबाईल न दिसल्याने त्यांनी घरात पाहणी केली. तेव्हा त्यांना चोरी झाल्याची बाब लक्षात आली. त्यांच्या तक्रारीवरून लकडगंज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि श्वान पथकाच्या मदतीने चोराचा शोध पोलीस घेत आहेत.