नागपूर : आधी शिक्षकांची पदे कमी करणे आणि नंतर कमी पटसंख्या असलेल्या शाळेत कंत्राटी पद्धतीने सेवानिवृत्त शिक्षक व बेराेजगारांची नियुक्ती करण्याच्या आदेशाने राज्यभरातील शिक्षकांमध्ये तीव्र असंताेष पसरला आहे. हे दाेन्ही निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी टप्प्या-टप्प्याने आंदाेलन केल्यानंतर बुधवार २५ सप्टेंबरला राज्यातील हजाराे प्राथमिक शिक्षक काम बंद करून सामूहिक रजेवर गेले.
नागपुरात विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह हजाराे शिक्षकांनी बुधवारी यशवंत स्टेडियम ते संविधान चाैकापर्यंत आक्राेश माेर्चा काढला. या ठिकाणी सभा घेण्यात आली. यावेळी लीलाधर ठाकरे, धनराज बाेडे, तुषार अंजनकर, राजकुमार वैद्य, प्रवीण फाळके, अनिल गाेतमारे, लीलाधर साेनवने, प्रमाेद लाेन्हारे, आशुताेष चाैधरी, उमाकांत अंजनकर, शरद भांडारकर, परसराम पिल्लेवान, परसराम गाेंडाणे, शुद्धाेधन साेनटक्के, राम धाेटे, जुगलकिशाेर बाेरकर, मुरलीधर काळमेघ, मिलिंद वानखेडे, विलास भाेतमांगे, याेगेश कडू आदी पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात हे आंदाेलन करण्यात आले.
राज्य शासनाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा शासन निर्णय काढून शाळांतील शिक्षकांची पदे कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ५ सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाने २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेतील दोन शिक्षकांपैकी एक पद बंद करून त्याठिकाणी कंत्राटी स्वरूपात सेवानिवृत्त शिक्षक किंवा बेरोजगाराची करार पद्धतीने नियुक्ती होणार आहे. शिक्षक संघटनांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने २३ सप्टेंबर रोजी ५ सेप्टेंबरच आदेश मागे घेऊन १० पेक्षा कमी पटसंख्येच्या बाबतीत कंत्राटी बेरोजगार नियुक्ती कायम ठेवण्याची दुरुस्ती करणारा आदेश काढला. मात्र राज्यातील कोणतीच शाळा बंद करू नये म्हणून केलेली दुरुस्ती अमान्य करीत दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शाळा सुरु होऊन तीन महिने झाले असताना विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाहीत. ज्याठिकाणी गणवेश मिळाले ते मापाचे नाहीत, गणवेशाचा कापड अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. अनेक शाळांत पाठ्यपुस्तके उपलब्ध नाहीत. शाळांमध्ये डेस्क-बेंच, आसनपट्ट्या नाहीत, त्या उपलब्ध कराव्या. शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्ती करावे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिक्षक संघटना आंदोलनावर ठाम राहतील, असा इशारा शिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष केशव जाधव आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिला.