दयानंद पाईकरावलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. एसटीच्या नागपूर विभागातील आठ आगार तसेच विभाग नियंत्रक कार्यालय आणि विभागीय कार्यशाळेत हे युनिट लावण्यात येणार आहे.कोरोनामुळे एसटीत लॉक डाऊन करण्यात आले आहे. लॉक डाऊनच्या काळात सर्व एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रवाशांची काळजी घेण्यासाठी एसटी प्रशासनाने पाऊल उचलले आहे. नागपुरातील विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. कार्यशाळेतील भाराचा वापर करून अवघ्या ३ हजार रुपयात हे युनिट तयार करण्यात आले आहे. यात १० सेकंदात व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य होणार आहे. अशा प्रकारचे १० युनिट नागपूर विभागात तयार करण्यात येणार आहेत. हे युनिट गणेशपेठ बसस्थानक, वर्धमाननगर बसस्थानक, इमामवाडा आणि घाट रोड बसस्थानकावर लावण्यात येणार आहे. तर नागपूर ग्रामीणमध्ये काटोल, उमरेड, सावनेर, रामटेक बसस्थानक, विभागीय कार्यशाळा आणि विभाग नियंत्रक कार्यालयात लावण्यात येणार आहे. प्रवाशी बसस्थानकावर आल्यानंतर या युनिटमध्ये निर्जंतुकीकरण झाल्यानंतरच बसमध्ये बसणार आहे. विभागीय कार्यशाळेत नियंत्रण समिती ३ चे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप, विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांच्या हस्ते या युनिटचा शुभारंभ करण्यात आला. हे युनिट साकारण्यासाठी यंत्र अभायंता संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली ज्योती उईके, मुख्य तंत्रज्ञ गजभाये, सहाय्यक आबीद अंसारी, इलेक्ट्रिशियन डी. आर. इंगळे, वेल्डर राजु डहारे, सोनडवले, झेड. आर. इरफान यांनी महत्वाची भामिका बजावली. लॉकडाऊन संपल्यानंतर एसटीच्या प्रवाशांसाठी प्रशासनाने हे युनिट तयार केल्यामुळे आता प्रवासी बिनधास्त एसटी बसने प्रवास करू शकणार आहेत.