नागपूर : आ. विकास ठाकरे यांनी काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर समर्थक व विरोधकांमध्ये सोशल मीडियावर वॉर भडकल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे यांनी संकट काळात काँग्रेसला कसे तारले, याचा लेखाजोखा त्यांचे समर्थक मांडत होते, तर ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व गिरीश पांडव यांची दावेदारी कशी भक्कम आहे, हे त्यांचे समर्थक पटवून देत होते.
‘विकासभाऊ, प्रफुल्ल भाऊ, गिरीश भाऊ..’ या तीनही भाऊंचे समर्थक आपलेच भाऊ कसे भारी हे सोशल मीडियावर मांडण्यात व्यस्त होते. फेसबुकसह काही व्हाॅटस्ॲप ग्रुपवर समर्थकांमध्ये खटके उडाल्याचेही पाहायला मिळाले.
आ. विकास ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे कळताच त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले. पडतीच्या काळात ठाकरे यांनी आंदोलने करून पक्षाला ताकद दिली. ते घरी लपले नाहीत तर लढले, अशा पोस्ट त्यांच्या समर्थकांनी केल्या. राजीनामा दिला असला तरी महापालिकेची निवडणूक त्यांच्याच नेतृत्वात होईल, असाही दावा समर्थकांनी केला. प्रफुल्ल गुडधे यांच्या समर्थकांनी तर गुरुवारी रात्री ते शहर अध्यक्ष झाल्याचे जाहीर करीत त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्याचा सपाटाच लावला. या पोस्टमुळे ठाकरे व पांडव समर्थकांकडून खरेच अशी नियुक्ती झाली का, अशी विचारणा करणारे फोन पत्रकारांना आले. समर्थकांनी गुडधे हे कसे सक्षम आहेत, त्यांच्या नेतृत्वात आता काँग्रेसचा महापौर बसेल, काँग्रेसचे अच्छे दिन येतील, असा दावा त्यांचे समर्थक शुभेच्छा देताना करीत होते.
शुक्रवारी सकाळी गिरीश पांडव यांच्या समर्थकांनी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यात पांडव हे कसे सर्वांना चालणारे, संयमी व मितभाषी आहेत, हे पटवून देण्यात आले आहे. काँग्रेसला गटबाजीने पोखरले असताना पांडव हेच सर्व गटांना एकत्र करून काम करू शकतात, असाही दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे.
प्रदेशाध्यक्षांवरही टीकेचे बाण
विद्यमान अध्यक्षांचा राजीनामा व नव्या अध्यक्षांची निवड या मुद्यावरून युवक काँग्रेसचे कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. युवक काँग्रेसचे दक्षिण-पश्चिम उपाध्यक्ष प्रणीत मोहोड यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत व्हाॅटस्ॲपवर आक्षेपार्ह पोस्ट केली. तीत ‘नाना पटोले बीजेपी का सेटिंगबाज नेता है, काँग्रेस को खराब करने के लिए आया है’, असे आक्षेपार्ह लिखाण करण्यात आल्याची तक्रार चिंचभवन येथील कार्यकर्ते आकाश नारायण बोबडे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली. पक्षाची बदनामी करणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी बोबडे यांनी केली.