नागपूर : महापालिकेची निवडणूक जाहीर हाेण्यास अद्याप विलंब असताना काँग्रेस-भाजपच्या नेत्यांमध्ये शहरातील विकास कामांवरून आराेप-प्रत्याराेपांच्या फैरी झडणे सुरू झाले आहे. शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. उल्लेखनीय म्हणजे फुटाळ्याचा प्रकल्प गडकरी यांच्या कल्पनेतून साकार हाेत आहे.
नितीन राऊत यांनी झाेपडपट्टीधारकांना पट्टे वाटपाच्या कार्यक्रमादरम्यान बाेलताना फुटाळ्यात तयार हाेत असलेली प्रेक्षक गॅलरी अनावश्यक असल्याचा आराेप करीत या कामाची चाैकशी हाेईल, असे जाहीर केले. यावरून भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण मागील तीन वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू असून आता ते पूर्णत्वास येत आहे. काही महिन्यांपूर्वी राऊतांनी गडकरी यांच्यासमवेत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावासुद्धा घेतला हाेता. या प्रकल्पासाठी गडकरी यांनी रस्ते परिवहन मंत्रालयाच्या केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) मधून निधी मंजूर करून घेतला. हा प्रकल्प महामेट्राेद्वारे पूर्ण करण्यात येत आहे.
राऊत म्हणाले, नागपूर सुधार प्रन्यासने फुटाळ्याचा किनारा आकर्षकपणे विकसित केला हाेता व हा परिसर नागपूरकरांसाठी अतिशय आवडीचे ठिकाण ठरले हाेते. मात्र प्रेक्षागॅलरीमुळे तलावाचे मनमाेहक दृश्य पाहण्यात अडथळा निर्माण झाला आहे. त्यांच्यामते ही गॅलरी राेडच्या मागे उभारणे साेईस्कर ठरले असते.
या आराेपाला प्रत्युत्तर देण्यासाठी गडकरी यांनी शनिवारी फुटाळा तलाव आणि गॅलरीचे निरीक्षण करण्यासाठी दाैरा केला. यावेळी नासुप्रचे सभापती मनाेजकुमार सूर्यवंशी आणि महामेट्राेचे संचालक महेशकुमार हेही उपस्थित हाेते. गडकरी यांनी नासुप्रला लेजर शाेचे काम तातडीने सुरू करण्यास सांगितले. तसेच प्रेक्षागॅलरीचे कामही लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना महामेट्राेला दिली. लेजर शाे सुरू हाेईल आणि गॅलरी तयार झाल्यानंतर हे आकर्षक दृश्य पाहण्यासाठी विदर्भभरातून पर्यटक येथे येतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.