नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकारणाची झूल ओढून गुन्हेगारी करणाऱ्या आणि नंतर गुन्हेगारीतून राजकारण करणाऱ्या गँगस्टर रणजित सफेलकरच्या कथित राजकीय पार्टीत सहभागी होऊन ठिकठिकाणच्या गुंडांनी नेतेगिरी सुरू केली होती. मात्र, क्राईम ब्रान्चच्या ‘महाराजांनी’ त्यांना असा काही प्रसाद दिला की अनेक गुंडांच्या डोक्यावर बसलेले नेतेगिरीचे भूत उतरले. नव्हे, पळाले. त्यामुळे आपण एक महिन्यापूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. यापुढे कधीही आपण नेतेगिरी करणार नाही, असा लेखी कबुलीनामाच अनेक ठिकाणच्या श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिला आहे.
अनेकांची हत्या करून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त करणारा, कुणाची शेतजमीन, कुणाचा प्लॉट, कुणाचे दुकान तर कुणाच्या घरावर कब्जा मारून त्यांना रस्त्यावर आणणारा, अनेकांकडून खंडणी वसूल करून त्यांचे जगणे मुश्कील करून सोडणारा गँगस्टर रणजित सफेलकर आणि त्याच्या टोळीतील काही गुंडांवर पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने यांनी चार महिन्यांपूर्वी आपली नजर वळवली होती. त्याच्या पापाची जंत्री बाहेर काढून भक्कम पुरावे जमविल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सफेलकर आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. महिनाभराच्या चाैकशीत या टोळीने तीन हत्या, अपहरण, खंडणी वसुली आणि जमीन बळकावण्याचे डझनभर गुन्हे केल्याची कबुली दिल्यानंतर या टोळीवर दोन वेगवेगळ्या प्रकरणात पोलिसांनी मोक्का लावला. सफेलकरने आधी राजाश्रय मिळवला आणि नंतर तो स्वत:च नेतागिरी करू लागला. त्याने श्रीराम सेना बनवून नागपूर शहर आणि जिल्हाच नव्हे तर वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, छिंदवाडा, जबलपूर, कटनीसह ठिकठिकाणी आपल्या सेनेच्या शाखाही उघडल्या. त्याचे मोठमोठे फलक (बोर्ड) लावून थाटामाटात कार्यालये सुरू केली. अर्थात बहुतांश ठिकाणी अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून त्या भागातील गुंडच पदाधिकारी होते. हे पोस्टर बॉय गुंड चक्क त्या त्या भागात श्रीराम सेनेच्या बॅनरखाली नेतेगिरी करत होते. ते लक्षात आल्यानंतर यातील अनेकांना नागपूरच्या गुन्हे शाखेत बोलविण्यात आले. पोलिसांनी सफेलकरची वरात काढल्याची माहिती मिळाल्याने आधीच त्या गुंडांना धडकी भरली होती. उसने अवसान आणून नागपुरात पोहचलेल्या त्या गुंडांना गुन्हे शाखेत ‘गजानन महाराजांचा प्रसाद’ मिळाला. तो मिळणार याचे संकेत आधीच मिळाल्याने अनेकांनी श्रीराम सेनेला आपण आधीच राम राम ठोकल्याचे सांगितले. यापुढे कधीही आपण नेतेगिरी करणार नाही, असा लेखी कबुलीनामाच अनेक ठिकाणच्या श्रीराम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे दिला आहे.
अनेकांनी दाखवले फोटो
श्रीराम सेनेचा फलक उतरवताना काहींनी फोटो काढले आणि पुरावा म्हणून हे फोटो गुन्हे शाखेत दाखवले. काहींनी आपल्या राजीनाम्याची झेरॉक्सही ‘गजानन महाराजां’पुढे ठेवली. यापुढे अजिबात आपले पोस्टर कुठे दिसणार नाही, अशी हमीही अनेकांनी लेखी स्वरूपात दिल्याचे समजते.
----