लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहावीचा निकाल दुपारी १ वाजता लागला आणि निकालाची वेबसाइट क्रॅश झाल्याने विद्यार्थ्यांची नाराजी बोर्डाला सहन करावी लागली. आता बोर्ड सीईटीची परीक्षा आयोजित करीत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना नोंदणी करायची आहे. १९ जुलैपासून महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने वेबसाइट सुरू केली आहे. पण, दोन दिवस झाले वेबसाइट ओपनच होत नसल्याने विद्यार्थ्यांपासून पालकांपर्यंत सर्वच त्रस्त झाले आहेत.
अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा कॉमन एंट्रेन्स टेस्ट (सीईटी) होणार आहे. परीक्षेचे आयोजन राज्य शिक्षण मंडळ करणार आहे. परीक्षा देण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण व संशोधन परिषदेने दिलेल्या वेबसाइटवर जाऊन विद्यार्थ्यांना अर्ज भरायचे आहे. यावर्षी दहावीचा राज्याचा निकाल ९९.९५ टक्के लागला. जवळपास १५ लाखांवर विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी या विद्यार्थ्यांना सीईटी द्यायची आहे. कारण, सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रथम प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी सीईटीसाठी नोंदणी करीत आहेत. पण, वेबसाइटला अर्जांचा भारच सांभाळणे अवघड होत असल्याने वेबसाइट सुरूच होत नाही. त्यामुळे पालक वैतागले आहेत. विद्यार्थी कधी मोबाइलवरून तर कधी सायबर कॅफेमध्ये जाऊन प्रयत्न करीत आहेत. शाळांमध्ये सुद्धा शिक्षक विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी वेबसाइट सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
सर्व्हर सक्षम नाही
शिक्षण विभाग ऑनलाइनवर भर देत आहे. पण, ऑनलाइनसाठी जे तंत्रज्ञान आवश्यक आहे, ते उपलब्धच नसल्याने वेबसाइट क्रॅश होण्यासारख्या घटना घडत आहेत. निकाल दुपारी १ वाजता लागला आणि एकाच वेळी लाखो विद्यार्थ्यांनी वेबसाइट बघायला सुरुवात केली. त्यामुळे सर्व्हरवर लोड वाढला आणि वेबसाइट क्रॅश झाली. अशीच परिस्थिती सीईटीच्या वेबसाइटच्या बाबतीत झाली आहे. आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते सरकारकडे सक्षम तंत्रज्ञान आहे. इन्कम टॅक्सचे काम इन्फोसिस, पासपोर्टचे काम टीसीएससारख्या मोठ्या कंपन्यांकडे दिले आहे. तिथे अशा अडचणी येत नाहीत. शिक्षण विभागाच्या वेबसाइट आउटडेटेड असतात, त्यांचे सर्व्हर लोड सहन करू शकत नाहीत. ज्यांना कंत्राट दिले जाते, त्यांनी त्या दर्जाचे काम केले नाही, अशी अनेक कारणे आहेत.
हा शिक्षणाचा खेळखंडोबा आहे
निकालाच्या दिवशी वेबसाइट क्रॅश झाली. आता सीईटीची वेबसाइट सुरू होत नाही. शासनाजवळ ऑनलाइन शिक्षणाची सक्षम यंत्रणाच नाही. प्रशासनाचे त्यावर नियंत्रण नाही. सक्षम नसलेल्या कंत्राटदाराला ही कामे दिली जातात. त्यामुळे वेबसाइट ऑपरेट होत नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना, पालकांना सहन करावा लागतो. शासनाने शिक्षणाचा खेळखंडोबा मांडला आहे, असेच म्हणावे लागेल.
अनिल शिवणकर, संयोजक, भाजप शिक्षक आघाडी