मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याचा मानस असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे. त्यांनी नागपूर-गोवा हायवेसाठीचा अख्खा प्लानच एका कार्यक्रमात सांगितला. नागपूर ते गोवा हा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल असं फडणवीस म्हणाले. तसंच राज्यात कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे आणि राज्यातील कोणत्याही भागात सहज पोहोचता येईल असे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत, असंही ते म्हणाले. नागपुरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली होती. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीसांचं ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. याच्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्णत्वास गेलेलं आहे. तर काही महिन्यात संपूर्ण महामार्ग तयार होईल असा अंदाज आहे. आता फडणवीसांनी आपलं पुढचं टार्गेट नागपूरला गोव्याशी जोडण्याचं ठेवलं आहे. यासाठी ते प्रयत्नशील असल्याचं सांगण्यात येत आहे.
"नवीन सरकार हे फायलींवर बसणारं नाही. हे काम करणारं सरकार आहे", असंही फडणवीस म्हणाले. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेगानं काम आम्हाला करायचं आहे. आम्हाला २०-२० मॅच खेळायची आहे. त्यामुळे राज्यात वेगानं विकास कामं होताना दिसतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा चेहरा बदलेल. समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार असणार आहे. स्वातंत्र्यापासून ते २०१५ सालापर्यंत मुंबई एमएमआर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपये इन्फ्रास्टक्चरवर खर्च केले गेले. तेवढेच मी पाच वर्षांत केले, असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.