नागपूर :
तब्बल सात दिवसांनंतर शुद्ध सोन्याचे भाव १५ नोव्हेंबरला पुन्हा ६१ हजार रुपयांवर पोहोचले. याआधी ८ नोव्हेंबरला ६१ हजार रुपये भाव होते. दिवाळीच्या दिवसात भाव ६१ हजारांच्या आत होते. नागपुरात लक्ष्मीपूजनाला सोन्याची ६०,३०० रुपयांत विक्री झाली, हे विशेष.
१५ नोव्हेंबरला सोन्याचे दर तीन सत्रात वाढले. १४ नोव्हेंबरच्या ६०,६०० च्या तुलनेत बुधवारी सकाळच्या सत्रात २०० रुपये, दुपारच्या सत्रात पुन्हा १०० रुपये आणि सायंकाळी अखेरच्या सत्रात १०० रुपयांची वाढ होऊन भावपातळी ६१ हजार रुपयांवर पोहोचली. तर सात दिवसांत चांदीचे भाव १७०० रुपयांनी वाढले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोन्याची भाववाढ झाल्याचे सराफांनी सांगितले.
माहितीनुसार, ९ नोव्हेंबरला सोने १०० रुपयांनी कमी होऊन ६०,९०० रुपये, १० रोजी ६०,७०० रुपये, ११ रोजी ६०,३०० १२ नोव्हेंबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ६०,३०० रुपये, १३ रोजी ६०,२००, १४ रोजी ६०,६०० रुपये आणि १५ नोव्हेंबरला भाव ६१ हजार रुपयांवर पोहोचले. सोन्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता सराफा वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.