अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : वर्गखोलीतील बाकांवर बसलेली धूळ, वर्गखोलीच्या आडोशाला, कानाकोपऱ्यात पसरलेले जाळे आणि अस्वच्छतेचा सर्वत्र पसारा अशी दयनीय अवस्था असंख्य शाळांची झालेली आहे. अशातच उमरेड तालुक्यातील नऊ शाळांनी ही संपूर्ण मरगळ गुरुवारी (दि.१५) शाळेच्या पहिल्याच दिवशी झटकून टाकली. आजपासून शाळा सुरू झाल्या आणि तब्बल दीड वर्षानंतर शाळा बोलू लागल्या.
कोरोनाच्या एन्ट्रीनंतर १६ मार्च २०२० पासून शाळेचे दरवाजे बंद झाले होते. घराच्या चार भिंतीत हजारो विद्यार्थी अक्षरश: कोंडले गेले. टीव्ही, मोबाईल आणि चार भिंती हीच या विद्यार्थ्यांची दुनिया झाली. सारेच मोठ्या आतूरतेने शाळा सुरू होणार तरी कधी, असा प्रश्नांचा भडिमार करीत पालकांना ‘सळो की पळो’ करीत होते. अशातच ग्रामीण भागातील वर्ग ८ ते १२ च्या काही शाळा गुरुवारी अखेरीस सुरू झाल्या.
विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये थोडी भीती नक्कीच होती. पहिल्याच दिवशी नियमावलींचे बंधने पाळत गुरुवारी तालुक्यातील एकूण नऊ शाळांचा पहिला दिवस उजाडला. बाह्मणी, आपतूर, बेला, बोरगाव कलांद्री, खैरीबुटी, शिरपूर आणि मटकाझरी, उदासा आणि हेवती या गावांमधील वर्ग ८ वी ते १२ वीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.
शाळेचा गणवेश. पाठीवर स्कूल बॅग आणि हातात सायकल घेऊन शाळेच्या दिशेने भुर्रकन जाणाऱ्या मित्र-मैत्रिणींचा घोळका आज मात्र दिसला नाही. तो उत्साह, ती धावपळ आणि पळापळ दिसत नसली तरीही सर्वांच्याच चेहऱ्यावर शाळा सुरू झाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. त्याचे कारण एकच होते, शाळा सुरू झाली होती.
तालुक्यातील चांपा येथील विजय विद्यालयात प्रवेशद्वारापासून विशिष्ट अंतरावर गोलाकार वर्तुळ करीत विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या होत्या. सर्वच शाळांनी सॅनिटायझर, मास्क आणि स्वच्छता याकडे गांभीर्याने लक्ष दिले. स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडेही शाळांनी विशेष लक्ष दिले, हे येथे विशेष.
मधल्या कालखंडात जानेवारी २०२१ ला काही दिवस शाळा सुरू झाल्या होत्या. काही दिवसातच या शाळा पुन्हा बंद पडल्या. आता गुरुवारपासून सुरू झालेल्या शाळा टप्याटप्याने नियमित सुरू व्हाव्यात, अशी इच्छा सर्वच विद्यार्थ्यांची आहे. शिक्षकसुद्धा सज्ज झाले असून, पालकांचाही पुढाकार बऱ्यापैकी आहे. आता लवकर कोरोना हद्दपार व्हावा आणि आमच्या शाळा सुरू व्हाव्यात, अशी मनोकामना विद्यार्थी चर्चेतून व्यक्त करीत होते.
....
यस सर, हजर मॅडम...
उमरेड तालुक्यात वर्ग ८ ते १२ वीच्या एकूण २९ शाळा आहेत. यापैकी नऊ ग्रामपंचायतींनी शाळा सुरू करण्याचा ठराव पारित केला. २९ शाळांची पटसंख्या १,११६ असून यापैकी केवळ २०८ विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी हजेरी लावली. एकूण ६२ कार्यरत शिक्षकांपैकी ५७ शिक्षक कर्तव्यावर होते. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हजेरीपटावरील नाव पुकारताच ‘यस सर, हजर मॅडम’ असा आवाज वर्गखोलीत ऐकावयास मिळाला.
.....
विद्यार्थ्यांनी केले मन मोकळे
अगोदरसारखे खेळीमेळीचे वातावरण शाळेत राहिले नाही. सध्या मध्यांतरातील ‘तो’ गोंगाट, ‘ती’ लुडबुड आणि जेवणाचा डबा एकमेकांसोबत शेअर करण्याची ‘ती’ मजाच कोरोनामुळे निघून गेल्याची बाब बाह्मणी येथील लाल बहादूर विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी व्यक्त केली. आम्हाला ते जुनेच आनंदाचे दिवस पुन्हा हवे आहेत, अशा बोलक्या आणि मनमोकळ्या प्रतिक्रिया तनुजा वैद्य, सलोनी मने, तेजस्वी लुटे, आनंद आंबोने, प्रणय डोंगरे, स्रेहल ठवकर, अमन मंदिरकर, रोशन मंदिरकर आदींनी व्यक्त केल्या.