लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. याला दोन वर्षाहून अधिक कालावधी लोटला. नियमानुसार जमीन ताब्यात घेतल्यानंतर संबंधित कंपनीने दोन वर्षात उत्पादनाला सुरुवात करणे अपेक्षित आहे. या कालावधीत उत्पादन सुरू न केल्यास रक्कम न देता जमीन परत घेता येते. वास्तविक जमीन खरेदीपासून चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.पतंजलीने मिहान परिसरात सेझबाहेर २३४ एकर तर एसईझेड परिसरातील १०६ एकर जमीन घेतली आहे. सध्या या कंपनीत ३० ते ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी यातील चार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. काम चांगले नसल्याने या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे. वास्तविक ठरल्यानुसार कंपनीने उत्पादनाला सुरुवात केलेली नाही. वास्तविक बाबा रामदेव यांनी सहा महिन्यात उत्पादन सुरू होईल, असा दावा केला होता. मिहान परिसरात योगासोबतच बाबा रामदेव यांचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रकल्पामुळे विदर्भातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु कंपनीत बोटावर मोजण्याइतकेच कर्मचारी कार्यरत आहेत.विशेष म्हणजे गतकाळात रियल्टी कंपनीने १० एकर जमीन घेतल्यानंतर दोन वर्षात प्रकल्प सुरू न केल्याने कंपनीला दिलेली जमीन परत घेण्यात आली होती. याचा विचार करता पतंजली प्रकरणात महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (एमएडीसी) कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पतंजली कंपनीचा सुमारे ७० लाखांचा एक धनादेश वटला नव्हता.मिहान येथील प्रकल्पाच्या माध्यमातून विदर्भातील वनौषधी उत्पादनाला चालना मिळेल. यातून कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. यासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाईल. यातून शेतकºयांचा आर्थिक विकास होईल, अशी ग्वाही पाच वर्षांपूर्वी पतंजलीने दिली होती.कंपनीला अद्याप कर्ज मिळाले नाहीदेशात एफएमसीजी कंपन्यात अग्रस्थानी असलेल्या पतंजलीला नागपुरात प्रकल्प सुरू करण्यासाठी अद्याप बँके कडून कर्ज मिळालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार कर्जाच्या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. परंतु उत्पादन कधी सुरू करणार, यासंदर्भात कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. सुरुवातीला संत्रा, आवळा यासह अन्य फळांचा रस तयार करून त्यापासून औषधी निर्माण करणार आहे. एमएडीसीचे उपाध्यक्ष व प्रबंध निदेशक सुरेश काकाणी यांनी कंपनीने २० लाख चौरस फूट क्षेत्रात बांधकाम केल्याची माहिती दिली. परंतु अन्य प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नव्हती. एक कोटी किमतीची जमीन कंपनीने प्रति एकर २५.५० लाख दराने घेतली. याशिवाय कंपनीला हिंगणा मार्गाकडे रस्ता तयार करून दिला. मिहानमध्ये वीज कमी दराने मिळत आहे. काही दिवसापूर्वी कंपनीने वीज व पाणी कनेक्शनसाठी अर्ज केला आहे. परंतु उत्पादन सुरू करण्याबाबतचा निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे कंपनीवर आणखी किती दिवस मर्जी राहणार की अन्य कंपन्यांप्रमाणे कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोन वर्षानंतरही नागपुरात पतंजलीच्या उत्पादनाला सुरुवात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2019 11:51 PM
उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देप्रकल्पाची जमीन परत घेण्याची शक्यता : चार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले