मोरेश्वर मानापुरे
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून मेटल कूलर निर्मितीत नागपूर देशाची मुख्य बाजारपेठ झाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर नागपुरातील कूलर उत्पादकांमध्ये उत्साह संचारला असून, यंदा ६०० कोटींच्या व्यवसायावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे मार्च महिन्यापासूनच दिसू लागली आहे.
उन्हाचा तडाखा पाहता मार्च महिन्यात कूलर विक्रीचे ७० टक्के ‘टार्गेट’ पूर्ण होणार आहे. सर्व राज्यांतून कूलरची वाढती मागणी पाहता, अनेक उत्पादकांकडील स्टॉक संपला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे कूलर जवळपास २० ते २५ टक्के महाग झाला आहे.
उष्ण राज्यांमध्ये नागपुरातील कूलरची विक्री
नागपुरात संघटित आणि असंघटित उत्पादकांकडून वर्षाला जवळपास अडीच ते ३ लाख कूलरची निर्मिती होते. या उद्योगातून दरवर्षी ७० ते ८० हजार कुशल व अकुशल कामगारांना रोजगार मिळतो. या माध्यमातून मालवाहतूकदारांचाही कोट्यवधींचा व्यवसाय होतो. कूलरची किंमत, आकार आणि दर्जानुसार ६ ते ५० हजारांदरम्यान आहेत. नागपुरातून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, ओडिशा या राज्यांमध्ये कूलर पाठविले जातात.
सुटे भाग व कूलर निर्मितीचे ५०० पेक्षा जास्त कारखाने
तसे पाहता, वर्षभरच कूलरच्या सुट्या भागांची निर्मिती होते. मुख्य कूलर निर्मिती ऑक्टोबरपासून सुरू होते. त्या पूर्वीपासून कच्च्या मालाची खरेदी सुरू होते. संघटित नामांकित ब्रॅण्डचे मेटर कूलर निर्मितीचे कारखाने नागपूर शहरालगत तर असंघटित उत्पादनांचे कारखाने शहरात आहेत. याशिवाय या उद्योगाने ग्रामीण भागातील युवकांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एकूणच पाहता, नागपूर जिल्ह्यात संघटित आणि असंघटित उत्पादकांचे सुटे भाग व कूलर निर्मितीचे लहान-मोठे ५०० पेक्षा जास्त कारखाने आहेत.
कच्च्या मालाची किंमत दुपटीवर
कूलर निर्मितीसाठी लागणारी लोखंडी शीट, पंखे, मोटर, वुडवुल आदींच्या किमती दुपटीवर गेल्या आहेत. त्यामुळे फिनिश कूलरची किंमत वाढली आहे. वाढत्या तापमानामुळे कूलर खरेदीसाठी सर्वच दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
विदेशातही विक्री
नागपुरात निर्मित मेटल कूलर इराक आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती नामांकित कंपनीच्या संचालकाने दिली. कूलरचा आकडा न सांगता, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच कूलर नागपुरातून कंटेनरने मुंबईला आणि मुंबईहून या दोन्ही देशांमध्ये पाठविण्यात आले आहेत. पुन्हा ऑर्डर शिल्ल्क असल्याचे ते म्हणाले.
मार्चमध्येच उत्पादकांना दिलासा
यंदा कोरोना लॉकडाऊनचा कुठलाही अडथळा नसल्यामुळे आणि मार्चमध्ये तापमान वाढल्यामुळे तब्बल दोन वर्षांनंतर कूलर व्यवसायाला सुगीचे दिवस आले. दोन वर्षांपासून कर्जबाजारी असलेल्या उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. यंदा नफा फारसा होणार नाही, पण नुकसान भरपाई भरून निघण्याची शक्यता आहे.
राजेश अवचट, उपाध्यक्ष, विदर्भ कूलर उत्पादक असोसिएशन.