मौदा : वडिलांशी भांडण करून घरून निघून गेल्यावर दीड वर्षानंतर तो घरी परतला. पोलिसांनी त्याला त्याच्या भावाच्या स्वाधीन केले.
२८ मेच्या रात्री एक युवक गोंदियावरून एनटीपीसी, मौदा येथे येणाऱ्या कोळसा मालवाहू गाडीत बसला. एनटीपीसी मौदा (संरक्षित क्षेत्र) असल्याने कर्तव्यावर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या जवानांना तो आढळला. झडती घेतली असता त्याच्याजवळ २५० रुपये होते. त्याची विचारपूस केली असता त्याने राहुल सुरेश उईके (२२, रा. मारईगाव, ता. छिंदवाडा) असे नाव सांगितले. सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी याबाबत मौदा पोलिसांना अवगत केले. या युवकाची पोलीस उपनिरीक्षक जगदीश बिरोले यांनी चौकशी केली असता राहुल हा मागील दीड वर्षापासून वडिलांसोबत भांडण झाल्याने नागपूर येथील गड्डीगोदाम येथे राहत होता. तो तेथे मोलमजुरीचे काम करायचा. २८ मे रोजी दुपारी इतवारी रेल्वे स्टेशनवरून दोन मित्रांसोबत तो गोंदिया येथे गेला होता. परंतु गोंदिया येथे पोहोचल्यानंतर मित्रांसोबत भांडण झाल्याने त्याचे मित्र त्याला सोडून रायपूरकडे निघून गेले. राहुल हा नागपूरला परत जाण्याच्या बेताने रात्री नागपूरकडे जाणाऱ्या कोळशाच्या मालगाडीत बसला होता. मालगाडी मौदा, एनटीपीसी येथे पोहोचल्यावर सीआयएसएफ जवानांनी त्याला ताब्यात घेतले होते. याची शहानिशा करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक बिरोले यांनी कुंडीपुरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. त्यांच्याकडून राहुलच्या नातेवाइकाचा फोन नंबर मिळविला. पोलिसांनी याबाबत राहुलच्या भावाला माहिती दिली. ३० मे रोजी त्याचा भाऊ मौदा पोलीस स्टेशन येथे आला. पोलिसांनी त्याची राहुलसोबत भेट घालून दिली. या वेळी त्यांचे अश्रू अनावर झाले होते. पोलिसांच्या मदतीने घर सोडून गेलेला भाऊ मिळाल्याबद्दल त्याने पोलीस निरीक्षक बिरोले, पोलीस शिपाई प्रवीण जाधव, निशांत मेश्राम यांचे आभार मानले.