लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अवैध सावकारी प्रकरणात गुन्हे शाखेच्या कस्टडीत असलेला तपन जयस्वाल आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हे शाखेने शुक्रवारी पुन्हा एक गुन्हा दाखल केला.विमल दिनेश काळमेघ (वय ५२, रा. भगवान नगर वानाडोंगरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी तपन जयस्वालकडून १ मार्च २०१३ ला घर बांधण्यासाठी अडीच लाख रुपये व्याजाने घेतले होते. ठरल्याप्रमाणे ३५ हजार रुपये प्रति महिना परत करायचा होता. त्यानुसार विमल काळमेघ यांचा मुलगा राहुल हा सलग तीन महिने ३५ हजार रुपये प्रमाणे किस्त तपन आणि साथीदारांना देऊ लागला. आर्थिक अडचणींमुळे ३ महिन्यानंतर रक्कम देणे शक्य झाले नाही. त्यामुळे राहुलकडून तपन आणि साथीदारांनी आयडीबीआय बँकेचा एक कोरा चेक घेतला. कोऱ्या कागदा वर रेव्हेन्यू स्टॅम्प लावून सह्या घेतल्या. त्यानंतर २०१५ मध्ये काळमेघ यांच्या घराचे बांधकाम सुरू असताना आरोपी तपन त्याचे वडील रमेश किशनलाल जयस्वाल, साथीदार निखिल ऊर्फ गोलू लालसिंग मलिये, रवी ऊर्फ अण्णा आणि आशिष ऊर्फ दाततुटे या पाच जणांनी त्या प्लॉटवर येऊन त्याची विक्री करून मागितली. विमल यांनी नकार दिला असता आरोपींनी पिस्तूल काढून राहुल काळमेघ याच्या कानशिलावर लावले. या प्लॉटची विक्री करून दे, अन्यथा जीवे ठार मारू, अशी धमकी दिली. १७ मार्च २०२० ला या प्लॉटची विक्री केली तेव्हा आरोपींनी काळमेघ यांना दिलेल्या रकमेतील व्याज कपात करून १० लाख रुपये दिले. त्यावेळी गोलू मलिये याने त्यांच्याकडून व्याजाची रक्कम आणि पेनाल्टी असे एक लाख ६५ हजार रुपये परत घेतले. त्यानंतर पुन्हा ३५ हजार रुपये महिना देण्याची मागणी केली. नाही दिले तर तुझा गेम करू, अशी धमकी दिली. दरम्यान तपन आणि त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हे शाखेने कारवाईचा धडाका लावल्यामुळे राहुल तसेच त्याची आई विमल काळमेघ यांनी गुन्हे शाखेत तक्रार नोंदविली. त्यावरून शुक्रवारी प्रतापनगर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तपन टोळीविरुद्ध पुन्हा एक गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 9:41 PM