नागपूर : मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात भरती असलेल्या एका वृद्ध रुग्णाचा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी ८.२० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा खळबळ उडाली. अशीच घटना १५ मे रोजी घडली होती; परंतु अजनी पोलिसांना अद्यापही त्या मागील कारणांचा शोध लागला नाही.
दीपक सराफ (६२, रा. नागपूर) असे मृताचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सराफ यांना सादुपिंडाचा कर्करोग होता. शनिवारी ते सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरील गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागात भरती झाले. सोमवारी त्यांच्यावर एण्डोस्कोपी होणार होती. रविवारी सकाळी त्यांच्यासोबत मुलगा होता. चहा घेण्यासाठी तो खाली आला असताना वरून खाली पडण्याचा अचानक आवाज झाला. सुरक्षा रक्षकांसह सर्वच धावले. वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पाहत मुलाने आक्रोश केला. तातडीने सराफ यांना रुग्णवाहिकेतून मेडिकलच्या कॅज्युअल्टीमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेचा कोणी प्रत्यक्षदर्शी नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे सराफ यांनी स्वत:हून उडी घेतली की त्यांना ढकलले, की तोल जाऊन पडले, हे अद्याप पुढे आले नाही. अजनी पोलीस या घटनेला घेऊन चौकशी करीत आहे.
अशीच घटना १५ मे रोजी घडली. तुळशीराम बांगडे या ६५ वर्षीय इसम सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात शस्त्रक्रियेसाठी आला असताना सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाबाबत पोलिसांकडून अद्याप काही समोर आले नाही. सराफ यांच्या प्रकरणात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाच्या समोरील बाल्कनी व रॅम्प जिथे जाेडले आहेत त्या ठिकाणाहून ते खाली पडले असावे, असा अंदाज लावला जात आहे. या ठिकाणी रॅम्पची सुरक्षा भिंती कमी उंचीची आहे. अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील, डॉ. महाजन व इतरही वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते.