नागपूर : मोटरसायकलवर आलेल्या दोघांनी एका तरुणावर गोळी झाडून त्याच्या हत्येचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी झाडलेली गोळी सुदैवाने मोहम्मद यासिन कुरेशी (वय ३५) याच्या उजव्या हाताला चाटून गेल्याने तो बचावला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ओंकारनगर चौकाजवळ सोमवारी दुपारी दिवसाढवळ्या ही घटना घडली. गेल्या मंगळवारी (६ सप्टेंबर) अग्रसेन चौकाजवळ घडलेल्या निमगडे हत्याकांडाचा छडा लागायचा असतानाच घडलेल्या या ‘फायरिंग’मुळे पुन्हा सर्वत्र खळबळ निर्माण झाली आहे. यासिन कुरेशी चिकन सेंटरचा मालक असून, त्याच्यासोबत काही जणांचा जमिनीचा वाद आहे. तीन भूखंडाची संलग्न सुमारे १० हजार चौरस फुटाची ही जमीन मोक्याच्या ओंकरानगर चौकाजवळ आहे. आज घडीला तिची किंमत कोट्यवधीत आहे. मालकी हक्क सांगण्या-सोडण्यावरून त्यांच्यासोबत यापूर्वी अनेकदा वाद झाले असून प्रकरण कोर्टातही गेले आहे. जमिनीची मोक्का मोजणी तसेच कंपाऊंड करण्यावरून पुन्हा भांडण होण्याची भीती असल्यामुळे दुसऱ्या एकाने कोर्टात प्रकरण नेले होते. त्यावरून कोर्टाने अजनी पोलिसांना घटनास्थळी कोणताही वाद होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे (पोलीस संरक्षण देण्याचे) आदेश दिले आहे. त्याची माहिती मिळाल्याने यासिन सोमवारी सकाळी ११ वाजता अजनी ठाण्यात गेला. पोलीस संरक्षण व्यवस्था कधी करणार आहे, त्याची आपल्याला माहिती हवी असल्याचे त्याने ठाणेदार संदिपान पवार यांना विचारले. गणेशोत्सव सुरू असल्याने पुढच्या काही दिवसात ही व्यवस्था करू असे ठाणेदार पवार यांनी यासिनला सांगितले. त्यानंतर यासिन पोलीस ठाण्यातून त्याच्या दुकानात गेला. दुपारी १ ते १.३० च्या सुमारास श्याम बीअर बारच्या गल्लीमागे जात असताना पल्सरवर दोन तरुण आले. चालकाने हेल्मेट घातले होते. तर, मागे बसलेल्याने स्कार्फ बांधला होता. यासिनच्या तक्रारीनुसार, अचानक एकाने देशी कट्टा काढून यासिनवर गोळी झाडली आणि शिवीगाळ करीत ते पळून गेले. यासिनच्या उजव्या हाताच्या दंडाला चाटून गोळी बाजूच्या पाईपमध्ये शिरली. गोळीबाराचा आवाज आणि यासिनची आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी यासिनला आधी त्याच्या दुकानात नेले. अजनी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर यासिनला मेडिकलमध्ये नेण्यात आले. ‘भाई-भतिजा’ वाद यासिनच्या हत्येच्या प्रयत्नामागे डोबीनगर-मोमिनपुऱ्यातील ‘भाई-भतिजा’वादाचे मूळ असल्याचे बोलले जाते. पाच वर्षांपूर्वी ‘मासेमारीच्या धंद्यातून निर्माण झालेले वैमनस्य आणि त्यानंतर झालेल्या आबिद हत्याकांडातील आरोपीचे कनेक्शन या गोळीकांडामागे असल्याची संशयवजा चर्चा मोमिनपुऱ्यात सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. यामुळे तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका टोळीकडेही संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे.
पुन्हा दिवसाढवळ्या गोळीबार
By admin | Published: September 13, 2016 2:41 AM