आॅनलाईन लोकमतनागपूर : भीमा कोरेगाव हिंसाचाराविरोधात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला उपराजधानीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तुरळक घटना वगळता शहरात शांततामय पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. बहुतांश व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने व प्रतिष्ठाने बंद ठेवली होती हे विशेष. दरम्यान, दिवसभर शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला व कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.भीमसैनिकांवर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करीत शहरातील विविध भागात दलित संघटनांचे कार्यकर्ते निदर्शने करीत होते. वाडी, इंदोरा, शताब्दी चौक, भीमचौक, मानेवाडा चौक, इमामवाडा, जयताळा भागात प्रचंड संख्येत जमावाने घोषणाबाजी करीत घटनेचा निषेध नोंदविला. काही ठिकाणी रस्त्यांवर टायर जाळण्यात आले तर गंगाबाई घाट परिसरात एका बसवर दगडफेक करण्यात आली. या घटनेसोबतच शहरात दोन ते तीन ठिकाणी तुरळक दगडफेकीचे प्रकार झाले. मात्र हे अपवाद वगळता शहरात शांतता दिसून आली. दुपारनंतर संविधान चौकात हजारो कार्यकर्ते एकत्र आले होते व तिथे निदर्शने करण्यात आली. शताब्दी चौक आणि वाडीत जमाव आक्रमक होत असल्याचे पाहून पोलिसांनी सौम्य बळप्रयोग करून परिस्थिती हाताळली. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त असल्यामुळे कुणालाही दुखापत अथवा तशी अनुचित घटना नागपुरात घडली नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते.बसवाहतूक थांबलीमहाराष्ट्र बंदमुळे परिवहन सेवेला फटका बसला. बाहेरगावी जाणाऱ्या बसेस मध्यवर्ती बसस्थानकातून रवाना झाल्या नाही. शिवाय खासगी बसेसदेखील धावत नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. अनेक प्रवासी तर बसस्थानकातच थांबले होते. दुसरीकडे शहर बससेवादेखील प्रभावित झाली.शाळा, महाविद्यालयांना अघोषित सुटी