लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकोणविसाव्या व विसाव्या शतकातील भारताच्या जडणघडणीत अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.अ.ना.देशपांडे स्मृती समितीतर्फे आयोजित अ.ना.देशपांडे व्याख्यानमालेचे यावर्षीचे २६ वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य म.पांडे, कार्याध्यक्ष डॉ. वि.स.जोग, कार्यवाह डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे उपस्थित होते. हिंदी मोरभवनच्या उत्कर्ष सभागृहात अनादेंच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हे व्याख्यानसत्र पार पडले.डॉ. लेंडे यांनी भारतीय धर्मसंस्कृती-परंपरांची बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी दृष्टीने केलेली परखड चिकित्सा, त्यांच्यावरील पाश्चात्य विचारकांचा प्रभाव, त्यांची अद्वितीय स्वरूपाची ज्ञानलालसा, अत्यंत विपरीत व कष्टमय परिस्थितीत त्यांनी केसरी व सुधारक वृत्तपत्रातून केलेले समाजप्रबोधन या साऱ्या पैलूंवर अभ्यासपूर्ण भाष्य केले. प्राचार्य पांडे यांनी, आगरकरांच्या जीवनातील इंदूर संस्थानाची भरपूर पगाराची नोकरी नाकारण्याचा प्रसंग तसेच इतर काही प्रसंगांच्या आधारे त्यांची नि:स्पृहवृत्ती, बाणेदारपणा व तत्त्वनिष्ठा यांचे महत्त्व कथन केले. माधव देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. मधुरा देशपांडे यांच्या गीताने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. प्रास्ताविक डॉ. राजेंद्र नाईकवाडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. कृष्णा साकुळकर व संचालन डॉ. दिनेश खुरगे यांनी केले. यावेळी प्रकाश एदलाबादकर, डॉ. अरविंद जोशी, प्रा. प्रमोद सोवनी, माधुरी साकुळकर, डॉ. अजय कुळकर्णी, मुकुंद पाचखेडे आदी उपस्थिती होती.
आगरकरांचा विवेकवाद आजही प्रासंगिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:20 PM
समाजसुधारक विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांनी मांडलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद या तत्त्वांची प्रासंगिकता आजच्या विचारअंताच्या काळात विशेषत्वाने जाणवते, असे प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांनी केले.
ठळक मुद्देअ.ना.देशपांडे स्मृती व्याख्यानमाला