नरेश डोंगरे
नागपूर : गारठा भरविणाऱ्या थंडीत जन्मदाताच काळ बनून समोर होता. तो चाकूचे सपासप घाव घालत होता अन् त्यांच्या किंकाळ्या गारठल्या होत्या. १० वर्षांचा वृषभ अन् पाच वर्षांची टिया भयानक वेदनांनी ओरडू पाहात होते. मात्र, कधी प्रेमाने घास भरविणारा त्यांचा बाप जणू सैतानच बनला होता. मुलांनी ओरडू नये म्हणून त्याने त्यांचे तोंडही दाबले असावे. त्यामुळे काळ बनलेल्या बापासमोर या दोन निरागस जीवांनी तडफडतच प्राण सोडला असावा.
मंगळवारी, १८ जानेवारीला उघडकीस आलेल्या जरीपटक्यातील तिहेरी हत्याकांडाने अनेकांच्या मनाचा थरकाप उडविला आहे. आपल्या व्यसनासाठी गोड संसाराची राखरांगोळी करणारा क्रूरकर्मा मदन अग्रवाल (वय ३९) याने ज्या पद्धतीने पत्नी आणि पोटच्या मुलांना संपविले त्याची कल्पनाच काळजाचे पाणी करणारी ठरावी.
वृषभ आणि टिया या दोघांच्याही पोटावर चाकूचे अनेक घाव आहेत. तर, पत्नी किरणचा गळा कापलेला आहे. त्याने आधी झोपेत असलेल्या पत्नीचा गळा चिरला असावा. ती शांत झाल्यानंतर मुलाच्या पोटावर चाकूचे घाव घातले असावे अन् नंतर चिमुकल्या टियाच्याही पोटावर चाकूचे सपासप वार केले असावे. पोटात घाव घातल्या गेल्यामुळे बराच वेळेपर्यंत हे चिमुकले जीव वेदनांनी तडफडत असावे अन् काळासारखा क्रूरकर्मा बाप पाहून कदाचित त्यांच्या तीव्र झालेल्या वेदनांना कवटाळत त्यांनी जीव सोडला असावा. जन्मदाता असा असेल तर कशाला जगायचे, असा प्रश्नही या बिचाऱ्यांना अंतिम क्षणी पडला असावा अन् त्यावेळी तेथे मृत्यूही ओशाळला असावा.
उपराजधानीतील यापूर्वीची अमानुषता
उपराजधानीत यापूर्वीही असे काही थरारक हत्याकांड घडले. सात महिन्यांपूर्वी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत तत्पूर्वी कोराडी, तहसील, नंदनवन आणि गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारचे क्राैर्य घडले होते.
((१))
तहसील -
आलोक ऊर्फ चंदू अशोक माटूरकर (वय ४२) नामक क्रूरकर्म्याने १९ जून २०२१ ला पत्नी विजू ऊर्फ विजया, बिन्टी ऊर्फ परी (मुलगी, वय १४), साहिल (मुलगा, वय ११), लक्ष्मी देविदास बोबडे (सासू, वय ५५) आणि अमिषा (मेहुणी, वय २१) यांची हत्या केली. नंतर स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती.
((२))
कोराडी
- १८ ऑगस्ट २०२० डॉ. सुषमा राणे हिने मुलगा ध्रुव, मुलगी लावण्या आणि पती धीरज राणे यांना जेवणातून विषाक्त इंजेक्शन टोचले. त्यांची हत्या करून स्वत: गळफास लावून आत्महत्या केली होती.
((३))
नंदनवन -
१० जून २०१८
विवेक पालटकर नामक आरोपीने त्याचा स्वत:चा मुलगा कृष्णा, सख्खी बहीण अर्चना पवनकर, भाची वेदांती, जावई कमलाकर आणि त्यांची आई मीराबाई पवनकर या पाच जणांची हत्या केली होती.
((४))
तहसील
साधारणत: ८ ते १० वर्षांपूर्वी बिहारचे मूळ निवासी असलेल्या एका कुटुंबातील महिलेने पती आणि मुलाला विषाक्त भोजन देऊन त्यांची हत्या केली आणि स्वत:ही आत्महत्या केली होती.
((५))
गिट्टीखदान
- डिसेंबर २०२०
लक्ष्मीबाई धुर्वे (वय ७०. रा. हजारी पहाड) आणि यश मोहन धुर्वे (वय १०) या आजी-नातूची हत्या करून एका अल्पवयीन आरोपीने रेल्वेखाली आत्महत्या केली होती.
---