घर रिकामे करण्यासाठी भाडोत्री गुंडांकडून मायलेकाचे अपहरणनागपूर : सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरमपेठमागील भगवाघर ले-आऊट येथील एका कुटुंबाला काही वेळ ओलिस ठेवून मायलेकाला मारहाण करून कारमधून अपहरण केल्याचा आरोप असलेल्या मुख्य सूत्रधाराचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. दास यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला. कैलाशचंद गोकुलप्रसाद अग्रवाल (५७), असे आरोपीचे नाव असून तो सूर्यनगर कळमना येथील रहिवासी आहे. अग्रवाल याने भाडोत्री गुंडांना सोबत घेऊन १ सप्टेंबरच्या रात्री ११ वाजताच्या सुमारास रॉय यांचे घर गाठले होते. त्यांनी सुलेख रॉय यांना मारहाण करून संपूर्ण कुटुंबाला तब्बल तीन तास ओलिस ठेवले होते. घरातील सामान बाहेर फेकून दिले होते. त्यानंतर सुलेख रॉय आणि त्याच्या आईला कारमध्ये कोंबून धंतोली येथील यशवंत स्टेडियमजवळ पहाटे ३ वाजताच्या सुमारास सोडून दिले होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी भादंविच्या ३९५, ३६३, ४५२, ३४२, ५०४, ५०६, १०९, १२० ब कलमान्वये गुन्हा दाखल करून शिवप्रसाद मुरली बेंजकीवार (२६)रा. पांढरकवडा, भीम कोमल यादव (२३) रा. चंद्रपूर, नितीन ठाकूर (२३) रा. त्रिमूर्तीनगर, सूरज चौधरी (२५) रा. पारधीनगर हिंगणा, कैलाशचंद अग्रवाल (५७) रा. आणि परवेश गौरीशंकर गुप्ता (२४) रा. राजीवनगर पांढराबोडी, अशा सहा जणांना अटक केली होती. त्यांचे दोन साथीदार हे पळून गेलेले आहेत. आरोपींपैकी कैलाशचंद अग्रवाल याने जामीन अर्ज दाखल केला असता तो न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील राजेंद्र मेंढे यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
अग्रवालचा जामीन फेटाळला
By admin | Published: September 11, 2016 2:07 AM