नागपूर: अनेक मार्गावरच्या रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण (रिझर्वेशन) मिळेनासे झाले असले तरी उपराजधानीत अनेक दलाल प्रवाशांच्या हातावर कन्फर्म तिकिट ठेवत आहेत. त्यासाठी ते एका तिकिटावर तीनशे ते पाचशे रुपये घेऊन प्रवाशांची आर्थिक लुट करण्यासोबतच रेल्वे प्रशासनाच्याही डोळ्यात धूळ झोकत आहे.
सध्या रेल्वेगाड्यांमधील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आठ-पंधरा दिवसांपुर्वी तिकिट खिडकीवर जाऊनही बहुतांश गाड्यांमध्ये रिझर्वेशन मिळत नाही. लांबलचक वेटिंगचा नंबर पाहून बहुतांश प्रवासी दलालांकडे वळतात. हे दलाल मात्र एका तिकिटावर चक्क तीनशे ते पाचशे रुपये जास्त घेऊन कन्फर्म तिकिट मिळवून देतात. अशा प्रकारे एखाद्या परिवारातील दोन व्यक्तींना कोणत्या गावाला जायचे असेल तर दलाल त्यांच्याकडून जाण्याच्या दोन तिकिटांसाठी सहाशे ते एक हजार रुपये जास्त घेतात आणि परतीचे तिकिट पाहिजे असेल तर तेवढीच रक्कम पुन्हा घेतात.
दलालांचा हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून बिनबोभाट सुरू आहे. मध्ये मध्ये रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलीस दलालांकडे छापा घालून कारवाईसुद्धा करतात. मात्र, ईकडे एका- दोघांवर कारवाई होत असली तरी तिकडे बाकीचे दलाल आपला गोरखधंदा सुरूच ठेवतात. अशा प्रकारे रोज वेगवेगळ्या मार्गावरच्या शेकडो गाड्यांमधील तिकिटांचा काळाबाजार करून दलाल मंडळी लाखोंची कमाई करतात. दलालांच्या या नेटवर्कमध्ये रेल्वेशी संबंधित काही मंडळींचाही सहभाग असल्याची नेहमीच ओरड होते.
पर्सनल आयडीवरून बनविले जाते तिकिटबहुतांश दलाल नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदियासह ठिकठिकाणी दुकान थाटून बसले आहेत. रेल्वेच्या वेबसाईटवर जाऊन ते आपल्या पर्सनल आयडीचा उपयोग करून ई तिकिट बनवितात. त्यानंतर हेच तिकिट दामदुप्पट भावाने गरजू प्रवाशांना विकून हजारो रुपये कमवितात. अशा प्रकारे रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या वणी, राजूरा, चंद्रपूरातील दलालांकडे रेल्वे पोलिसांनी छापा मारून गेल्या आठवड्यात सहा दलालांना अटक केली होती, हे विशेष.