- जागतिक कावीळ दिन
नागपूर : ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’मुळे कावीळ हा आजार होतो. औषधोपचार न करताही कावीळ ९९ टक्के बरी होते. परंतु कावीळला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यातच चुकीच्या जाहिरातीमुळे ३० ते ४० टक्के रुग्ण आयुर्वेदाच्या नावावर असामाजिक तत्त्वांकडून उपचार घेतात. यामुळे जिथे दोन आठवड्यांत स्वत:हून बरा होणारा हा आजार गंभीर होत असल्याची प्रकरणे वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
२८ जुलै हा दिवस ‘जागतिक कावीळ दिन’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्ताने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे सहायक प्राध्यापक डॉ. अमोल समर्थ यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली.
डॉ. समर्थ म्हणाले, ‘बिलिरुबिन’च्या उच्चस्तरामुळे डोळ्याचा पांढरा भाग, त्वचा किंवा श्लेष्मल पडद्यात पिवळेपणा येतो, ही कावीळची लक्षणे आहेत. कावीळला इंग्रजीत ‘जॉन्डिस’ म्हटले जाते. कावीळ हा यकृताचा (लिव्हर) आजार आहे. व्हायरलच्या संक्रमणात लिव्हरच्या पेशी अपयशी ठरल्याने हा आजार होता. लिव्हरच्या गंभीर आजारांना दूर ठेवण्यासाठी तत्काळ निदान, योग्य लसीकरण आणि दारूच्या सेवनापासून स्वत:ला दूर ठेवणे आवश्यक ठरते.
- कावीळचे पाच प्रकार
‘हेपेटायटिस’ म्हणजेच कावीळ. याचे प्रामुख्याने पाच प्रकार आहेत. त्यामध्ये ‘हेपेटायटिस ए’, ‘बी’, ‘सी’, ‘डी’ व ‘ई’ यांचा समावेश आहे. यातील ‘हेपेटायटिस बी’ आणि ‘सी’ हे विषाणू मानवी यकृतावर गंभीर परिणाम करतात. या दोन्ही विषाणूंचा संपर्क हा रक्ताशी अधिक येतो. ‘हेपेटायटिस बी’ हा आईकडून बाळाकडे संक्रमित होण्याचा धोका असतो. ‘हेपेटायटिस ए’ आणि ‘ई’ हे विषाणू तोंडावाटे शरीरात पोहोचतात. याला वैद्यकीय भाषेत ‘फेस्को ओरल ट्रॉन्समिशन’ म्हणून ओळखले जाते. या रुग्णांना दूषित अन्नपदार्थ, पाण्यातून संसर्ग होतो.
- जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’
‘हेपेटायटिस’च्या विषाणूचा अभ्यास करून आता कुठे, १९७३ ते १९९० च्या दरम्यान माहिती उपलब्ध झाली आहे. परंतु आयुर्वेदच्या नावावर असामाजिक तत्त्व कोणत्याही प्रकारची कावीळ मुळापासून संपविण्याचा दावा करतात. जडीबुटीच्या नावावर ‘स्टेरॉयड’ देतात.
- कावीळ झाडण्यापासून दूर राहा
कावीळ बरा करण्याच्या नावावर कानात औषधी टाकणे, नाकात औषधी टाकणे, कावीळ झाडणे, पानात औषधी देणे, उलटीद्वारे कावीळ काढणे, शौचातून कावीळ काढणे, लघवीतून कावीळ काढणे आदी अघोरी प्रकार शहरात आजही सुरू आहेत. यामुळे जो रोग स्वत:हून बरा होऊ शकतो तो आणखी गंभीर होत असल्याचेही डॉ. समर्थ म्हणाले.