लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासनाच्या विविध विभागातून निघणाऱ्या बांधकामाच्या कामापैकी ३३ टक्के कामे ही सुशिक्षित बेरोजगार अभियंत्याना देण्यात यावी, या मागणीसाठी इंडियन अनएम्प्लॉईड इंजिनीअर्स असोसिएशनच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे अभियंत्यांची नोंदणी करताना दीड कोटी रुपयांपर्यंतच्या कामाची नोंदणी करण्यात येते. मात्र शासकीय विभागातून निघणारी कामे ही मोठमोठ्या कंत्राटदारांना वाटप करण्यात येते. संघटनेचे म्हणणे आहे की, सर्व शासकीय, अर्धशासकीय, महामंडळ आदीमध्ये स्थापत्यशी संबंधित निघणाऱ्या विभागामध्ये काम वाटप समिती बनविण्यात आली आहे. सा.बां. विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेत ३३ टक्के कामाचे वाटप करण्यात यावे. सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांकडून टेंडरच्या वेळी सुरक्षा ठेव माफ करण्यात यावी. ३० लाखापर्यंत कामाचे वाटप करण्यात यावे. ज्या ठेकेदारांकडे स्थापत्य अभ्यासक्रमाची पदवी नाही, त्यांना कामापासून बेदखल करण्यात यावे. संघटनेच्या वतीने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शाकीर अब्बास अली, प्रवीण खोब्रागडे, दीपेश कोलुरवार, नीलेश हिंगे, सतीशकुमार सिंग, शोभित रंगारी, प्रवीण घरजाळे, आशिक कुरेशी, अमोल चव्हाण, महेंद्र चिचघरे, नितेश कांबळे, अजित शर्मा, मनिष अग्रवाल, मनस्वी वºहाडे, शाहरुख खान आदी उपस्थित होते.