नागपूर : केंद्र सरकार प्रमाणेच महाराष्ट्र सरकारनेही पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करावेत, या मागणीसाठी आज नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. परंतु महाराष्ट्रात परिस्थिती तशीच आहे. इतर राज्यांकडे पाहता राज्य सरकारनेही जागे व्हावे, पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी बोलताना, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'केंद्र सरकारने दर कमी केल्यानंतर अनेक राज्यातील सरकारने दर कमी केले आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. मात्र, राज्य सरकार दर कमी करायला तयार नाही. राज्यात पेट्रोल आणि डिझेल १२ ते १५ रुपयांनी महाग विकले जात आहे.'
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क ५ रुपये आणि १० रुपयांनी कमी केले. त्यानंतर काही राज्यांनीही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला. त्यामुळे, नागरिकांना वाढत्या महागाईत थोडे का होईना पण दिलासा मिळाला. मात्र, महाराष्ट्रात अद्याप कर कमी केलेले नाहीत. राज्य सरकारने पेट्रोल डिझेल लावलेले कर कमी केलं तर महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळेल, अशी मागणी यावेळेस करण्यात आली.