नागपूर : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ येथील संविधान चौकात संयुक्त किसान मोर्चा, जन आंदोलन जनसंघर्ष समिती, कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने ‘किसान बचाव, लोकतंत्र बचाव आंदोलन’ करण्यात आले.केंद्र सरकारने कामगार कायदा रद्द करून नवे चार कायदे तयार केल्याबद्दल विरोध दर्शविण्यात आला. तसेच वीज कायदा-२०२० चा विरोध व्यक्त करण्यात आला. कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून १० कोटी स्वाक्षऱ्यांचे निवेदन केंद्र सरकारला पाठविले जात आहे. यासाठी नागपुरातही स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. संविधान चौक तसेच व्हेरायटी चौकात ५०० नागिरकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. सोमवारी हे निवेदन विभागीय आयुक्तांना सोपविले जाणार आहे.
या आंदोलनादरम्यान, सिटूचे अरुण लाटकर, महाराष्ट्र किसान सभेचे अरुण वनकर, आयटकचे राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले यांनी मार्गदर्शन केले. संचालन युगल रायलु यांनी केले.