लोकमत न्यूज नेटवर्क
सुमेध वाघमारे
नागपूर : केंद्रीय भारतीय वैद्यक परिषदेने (सीसीआयएम) मूत्ररोग, पोट आणि आतड्यांच्या, दंतरोग, नेत्ररोगासह ५८ प्रकारच्या शस्त्रक्रिया आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याची परवानगी दिली आहे. या विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) आंदोलन उभे केले आहे. तर दुसरीकडे ‘नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने (निमा) आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांची परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील ‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेचे स्वागत केले आहे.
‘सीसीआयएम’च्या अधिसूचनेविरुद्ध ‘आयएमए’ने ८ डिसेंबर रोजी नागपुरात चौकाचौकात शांततामय निदर्शने केली. तर ११ डिसेंबर रोजी एक दिवसीय संपही केला. ही ‘मिश्रपॅथी’ किती धोकादायक ठरू शकते याची जनजागृती त्यांनी हाती घेतली आहे तर , निमा संघटनेने संपाच्या दिवशी नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले. सोबतच गुलाबी रिबीन लावून नियमित रुग्णसेवा दिली. आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांना परवानगी देण्याच्या या विषयामुळे दोन ‘पॅथी’ समोरासमोर आल्या आहेत. रुग्णांचे फायदे, तोट्यांवर जनजागृती केली जात आहे.
-आयुर्वेदासारख्या प्राचीन शाखेचा विकास खुंटेल
आयुर्वेदातील अॅलोपॅथिक शस्त्रक्रियेचे हे मिश्रण आयुर्वेदासारख्या प्राचीन शाखेचा विकास खुंटवेल आणि काही काळात त्याचे अस्तित्व नाहीसे करू शकेल. यामुळे शासनाने ‘सीसीआयएम’ची अधिसूना मागे घ्यावी. राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने अशी सरमिसळ करण्यासाठी तयार केलेल्या चार समित्या त्वरित रद्द कराव्यात. सीसीआयएमच्या अधिसूचनेचा अंतिम दुष्परिणाम रुग्णाच्या आयुष्यावर व आरोग्यावर होणार आहे. यामुळे ‘आयएमए’तर्फे देशभरात नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती केली जात आहे.
-डॉ. अर्चना कोठारी
अध्यक्ष, आयएमए नागपूर
-शस्त्रक्रिया जीवन व मृत्यू यांच्यामधील सूक्ष्म सीमारेषा
कोणतीही शस्त्रक्रिया म्हणजे एक नाजूक प्रक्रिया असते. जी जीवन आणि मृत्यू यांच्यामधील सूक्ष्म सीमारेषा असते. आधुनिक वैद्यकीय सर्जन शरीरशास्त्र, शरीरक्रिया शास्त्र, बायोकेमिस्ट्री, पॅथालॉजी आणि अॅनेस्थेशियाचा सखोल अभ्यास करतो. पदवी मिळण्यापूर्वी अनुभवी आणि ज्ञानी आणि व्यासंगी प्राध्यापकांच्या हाताखाली शेकडो शस्त्रक्रिया करतो. गॅस्ट्रोइंटेस्टाइनल शस्त्रक्रिया आणि लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यासाठी आणखी काही वर्षे झटून कामे करावी लागतात. यामुळे याची तुलना आयुर्वेद अभ्यासक्रमाशी करता येणार नाही.
-डॉ. वाय. एस. देशपांडे
माजी अध्यक्ष, आयएमए महाराष्ट्र
-वरवरचे तंत्र शिक्षण देऊन परवानगी देणे धोकादायकच
सीसीआयएमच्या अधिसूचनेत बीएएमएस झालेल्या आयुर्वेद विद्यार्थ्यांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगीचा दुष्परिणाम रुग्णाच्या आयुष्यावर व आरोग्यावर होणार आहे. अॅलोपॅथीमध्ये सर्जन होण्याआधी विविध विषयांचा सखोल अभ्यास करावा लागतो. परंतु आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना आधुनिक वैद्यकाचे शिक्षण देणे आणि वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोक्याचे ठरु शकते.
-डॉ. राजेश सावरबांधे
सचिव, आयएमए नागपूर
-परिपत्रकात आयुर्वेद डॉक्टरांना अमर्याद अधिकार दिले नाही
‘आयएमए’ नेहमीच ‘आयएसएम’ पदवी डॉक्टरांच्या विरोधात राहिली आहे. विशेष म्हणजे, सरकारने १९९२ मध्ये परिपत्रक काढून शस्त्रक्रियेला मंजुरी दिली होती. २०१४ मध्ये याचे कायद्यामध्ये रुपांतर झाले. केंद्र सरकारने आता राजपत्रातील ‘सीसीआयएम’ची अधिसूचना काढली. यात करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया अंतर्भूत करण्यात आल्या. परंतु आता हे परिपत्रक आल्याने विनाकारण बाऊ केला जात आहे. यात आयुर्वेद डॉक्टरांना काही अमर्याद अधिकार दिलेले नाही. आयएमएने ही भूमिका समजून घ्यावी.
-डॉ. मोहन येंडे
राज्य संघटक, निमा महाराष्ट्र
-आयुर्वेदाला चालना मिळेल
देशातील बहुसंख्य खासगी इस्पितळात ‘बीएएमएस’ डॉक्टर्स हे निवासी मेडिकल अधिकारी म्हणून अतिदक्षता विभागापासून ते आंतर रुग्ण विभागात सेवा देत आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये विशेषत: ग्रामीण क्षेत्रात केवळ आयुर्वेदिक डॉक्टरच सेवा देत आहे. आजही अनेक आयुर्वेद चांगले सर्जन म्हणून प्रसिद्ध आहेत. आयुर्वेद हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. आयुर्वेदातील ‘शल्यतंत्र’ आणि ‘शालाक्यतंत्र’ पदव्युत्तरांना स्वतंत्रपणे करण्याचा परवानगीमुळे आयुर्वेदाला चालना मिळेल.
-डॉ. पंकज भोयर
सचिव, निमा नागपूर
-आयुर्वेद डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणेच आश्चर्यकारक
महर्षी सुश्रृत हे शल्यशास्त्राचे जनक आहेत. पाच हजार वर्षापूर्वी सुश्रृत यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यानंतरही आयुर्वेद पदवी डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे आश्चर्यकारक आहे. आयुर्वेद विद्यार्थ्यांना अॅलोपॅथिक शस्त्रक्रियांनी परवानगी देण्याच्या केंद्रीय सरकारच्या राजपत्रातील ‘सीसीआयएम’ची अधिसूचना रुग्णहिताची आहे. ‘आयएमए’ने विरोध करण्याचे कारण नाही.
नितीन वाघमारे
माजी अध्यक्ष, निमा नागपूर
नवीन कायद्याचे फायदे
आयुर्वेदाला चालना मिळेल
कोणकोणत्या शस्त्रक्रिया करता येईल हे स्पष्ट झाले
याचा फायदा विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांना होईल
आयुर्वेद विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल
केंद्र सरकारने अधिसूचना अधिक स्पष्ट केली आहे
नवीन कायद्याचे तोटे
आयुर्वेदासारख्या प्राचीन शाखेचा विकास खुंटेल
याचा दुष्परिणाम रुग्णाच्या आयुष्यावर व आरोग्यावर होईल
आधुनिक वैद्यकाचे वरवरचे तंत्र शिकवून शस्त्रक्रियेस परवानगी देणे धोकादायक ठरेल
रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता