लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अजनीवनातील हजाराे झाडांच्या कत्तलीला विराेध करीत नागपूरकरांनी शनिवारी जागतिक पर्यावरण दिन पाळला. शहरात ठिकठिकाणी विविध संघटनांनी आंदाेलन करून पर्यावरणासाठी जागर केला. नि:शुल्क ऑक्सिजन देणारी झाडे ताेडून विकास साधला जात नाही तर शहर भकास हाेते, असे ठणकावून सांगत हजाराे झाडांची कत्तल थांबवा, असे आवाहन करण्यात आले. शहरात वृक्षताेड हाेत असल्याने काळ्या फिती लावून काळा दिवस पाळण्यात आला. काही संघटनांनी रॅली काढून विराेध दर्शविला. ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी चिपकाे आंदाेलन करून वृक्षताेडीचा निषेध केला. संविधान चाैकातही हुंकार भरण्यात आला. आतापर्यंत दूर असलेले राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही पर्यावरण दिनानिमित्त या आंदाेलनात सहभागी हाेणे उल्लेखनीय ठरले.
‘हम नागपूरकर’चा रॅलीतून जागर
‘हम नागपूरकर’च्या माध्यमातून काॅंंग्रेसचे नेते अजनीवनाच्या वृक्षताेडीविराेधात रस्त्यांवर आले. काॅंग्रेस शहर सचिव मनीष चांदेकर, नगरसेवक मनाेज गावंडे व सुहास नानवटकर यांच्या नेतृत्वात अजनी ते वर्धा राेड ते अजनी अशी रॅली काढून विराेध दर्शविला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काॅंंग्रेस कमिटीचे महासचिव नगरसेवक प्रफुल्ल गुडधे-पाटील यांच्यासह सतीश यादव, माजी नगरसेवक वासुदेव ढोके, तनवीर अहमद, कुवर मेहरोलिया, राजेश रहाटे, हेमंत चौधरी, प्रशांत ढाकणे, मुकेश शर्मा, प्रकाश चवरे, रमेश राऊत, रणजित रामटेके, मंगेश शाहू, अशाेक महल्ले, प्रशांत पारधी, प्रबाेधन मेश्राम, प्रमाेद शिंदे, अजय वाघमारे, शांतनू सिरसाट, प्रशांत टेंभुर्णे, आदी उपस्थित हाेते. प्रफुल्ल गुडधे म्हणाले, प्रकल्पाला विराेध नाही; पण हजाराे झाडे ताेडून शहराचा विकास साधला जात नाही. पर्यावरणाचा समताेल राखण्यासाठी वृक्षताेडीला काॅंंग्रेसचा विराेध असल्याचे जाहीर केले.
तरुणांनी पाळला ब्लॅक डे
पर्यावरणाचा समताेल राखण्यासाठी वृक्षवल्लीचे संवर्धन हाेणे गरजेचे आहे. मात्र नागपुरात ४० हजार झाडे निर्दयपणे कापली जात आहेत. विकासाच्या नावे काळा अध्याय लिहिला जात असल्याचा आराेप करीत ‘टुगेदर वुई कॅन’ या तरुणांच्या संघटनेने शनिवारी पर्यावरण दिनी काळा दिवस पाळला. जाेसेफ जाॅर्ज व कुणाल माैर्य यांच्या नेतृत्वात अजनीवन परिसरात काळ्या फिती लावून वृक्षताेडीचा विराेध करण्यात आला.
संविधान चाैकात ‘अजनीवन बचावाे’चा जागर
पर्यावरणाप्रती नितांत प्रेम असलेल्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही आज अजनीवन वाचविण्याच्या आंदाेलनात सहभाग घेतला. ‘सेव्ह अजनीवन’च्या टीमतर्फे संविधान चाैक येथे अजनी वृक्षताेडीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदाेलन केले. जयदीप दास, अनसूया काळे-छाबरानी, श्रीकांत देशपांडे यांच्यासह आशिष घाेष, बाबा देशपांडे, वासुदेव मिश्रा, आरजे प्रीती, आक्षिता व्यास, आशा डागा यांच्यासह अनेक कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, रेल्वे व इतर यंत्रणेकडून लाेकांची दिशाभूल करून हजाराे झाडे ताेडण्याचे षड्यंत्र रचले जात असून लाेकांनी ‘हिरवेगार नागपूर’च्या बाजूने पवित्रा घेण्याचे आवाहन करण्यात आले.