स्नेहलता श्रीवास्तव
नागपूर : शेतकऱ्यांना रोगमुक्त रोपे मिळावीत यासाठी ‘आयसीएआर-सीसीआरआय’ने (इंडियन कॉन्सिल ऑफ ॲग्रीकल्चरल रिसर्च-सेंट्रल सायट्रस रिसर्च इन्स्टिट्यूट) पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत ‘सीसीआरआय’ने सात रोपवाटिकांशी करार केला आहे व त्यांना तंत्रज्ञान हस्तांतरित केले आहे. वर्षभरात आणखी २५ रोपवाटिकांशीदेखील सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.
सर्व प्रकारची लिंबूवर्गीय फळे रोपवाटिकांमधून मिळविलेल्या लागवड साहित्यातून घेतली जातात. परंतु जर ही रोपे सदोष असतील आणि त्यांना काही रोग असतील तर ते काही वर्षांत संपूर्ण बाग नष्ट करू शकतात. दुर्दैवाने बहुसंख्य रोपवाटिका रोपवाटिका कायद्यांतर्गत नियमांचे पालन करत नाहीत व त्यामुळे विषाणू, जिवाणू किंवा इतर रोगजनक वनस्पती शेतकऱ्यांच्या वाटी येतात.
संस्थेला तंत्रज्ञान हस्तांतरण शुल्क म्हणून एका रोपवाटिकेकडून सुमारे ९ लाख रुपये मिळतात.
ईशान्येकडील लिंबूवर्गीय राज्ये, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात लवकरात लवकर पोहोचण्याची आमची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आणखी ३-४ वर्षांत सर्व काही व्यवस्थित राहिल्यास सर्व लिंबूवर्गीय जातींची रोगमुक्त रोपे देशभर उपलब्ध होतील, असे सीसीआरआयचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी सांगितले.
लिंबूवर्गीय (संत्रा, मोसंबी, लिंबू) या पिकांचा वार्षिक उद्योग २५,००० कोटी रुपयांचा आहे. दरवर्षी देशभरात सुमारे दीड कोटी रोपांची गरज असते. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झालेल्या झाडांच्या अशा कळ्या-कलमांचा वापर हे रोगांच्या प्रसाराचे मुख्य कारण आहे.
आम्ही एक संशोधन संस्था आहोत आणि म्हणून आमचे प्राधान्य संशोधन व विकास आहे. त्यामुळे प्रदेशाची मागणीही आम्ही पूर्ण करू शकत नाही. परिसरात सुमारे १५ लाखांची मागणी आहे. परंतु आम्ही केवळ साडेतीन लाख रोपेच निर्माण करू शकतो. तसेच देशातील सर्व लिंबूवर्गीय क्षेत्रांतील शेतकऱ्यांनाही या रोपांची गरज आहे. त्यामुळेच सात रोपवाटिकांसोबत करार करण्याचे पाऊल उचलण्यात आले, असे डॉ. घोष यांनी स्पष्ट केले.
असे आहे तंत्रज्ञान
सीसीआरआयने २००३-०४ मध्ये निरोगी मातृवृक्षांच्या निर्मितीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवत ‘एसटीजी’ (शूट टिप ग्राफ्टिंग) वापरून रोगमुक्त रोपांसाठी तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्रज्ञानाला ‘कंटेनराइज्ड नर्सरी सिस्टिम’ असे म्हणतात. त्यात पॉटिंग मिश्रणाचे ‘सोलरायझेशन’, कीडमुक्त शेडमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक रोपवाटिका वाढवणे तसेच मातृ वनस्पतींचे सेरोलॉजिकल आणि बायोलॉजिकल इंडेक्सिंग व रोगजनकांच्या साफसफाईसाठी ‘एसटीजी’ तंत्र वापरणे याचा त्यात समावेश आहे.